मुकेश अंबानींना 'जिओ'ची भन्नाट आयडिया कुणी सुचवली माहित्येय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 04:31 PM2018-03-16T16:31:43+5:302018-03-16T16:33:13+5:30
रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना रिलायन्स जिओ सुरू करण्याची भन्नाट कल्पना कुणी दिली ?
मुंबई- रिलायन्स जिओचं सीमकार्ड आज प्रत्येकजण वापरताना पाहायला मिळतं. जिओचं नेटवर्क न वापरणारे क्वचितच सापडतील. इतकंच नाही, तर रिलायन्स जिओने दोन वर्षांच्या आत भारताला दुनियेतील सगळ्यात मोठा ब्रॉडबॅण्ड डेटा वापरणारा देश बनवलं आहे. पण रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना रिलायन्स जिओ सुरू करण्याची भन्नाट कल्पना कुणी दिली ? हे तुम्हाला माहितीये का ? मुकेश अंबानी यांना त्यांची मुलगी ईशा अंबानी हिने जिओची भन्नाट कल्पना सुचविली आहे. मुकेश अंबानी यांनी स्वतः याबद्दलची माहिती दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला 'ड्रायवर्स ऑफ चेंज' पुरस्कार मिळाल्यानिमित्ताने त्यांनी याबद्दलची माहिती दिली.
ईशाने 2011 साली जिओची कल्पना दिल्याचं त्यांनी म्हंटलं. त्यानंतर रिलायन्सने भारतीय मोबाइल बाजारपेठेत तब्बल ३१ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २.०१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मध्ये लाँच केलेल्या या कंपनीने टेलिकॉमच्या दुनियेत वादळ आणलं. ग्राहकांना सुरुवातीला मोफत कॉल्स आणि डेटा देऊन मार्केटवर जवळजवळ ताबा मिळविला. मोबाइल कंपन्यांना या स्पर्धेत टिकाव लागण्यासाठी डेटा आणि कॉलिंगचे दर घटवावे लागले.
मुकेश अंबानी यांनी म्हंटलं की, जिओची कल्पना सगळ्यात आधी माझ्या मुलीने 2011 साली दिली. तेव्हा ती येल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होती व सुट्ट्यांसाठी घरी आली होती. घरातील इंटरनेट नीट चालत नसल्याचं तिने कॉलेजचं काम करताना सांगितलं होतं. ईशा आणि तिचा जुळा भाऊ आकाश भारताची युवा पिढी आहेत. ही पिढी जनरेशन नेक्स्ट बनण्यासाठी खूप वाट पाहू शकत नाही. त्यांनी मला पटवून दिलं की ब्रॉडबँड इंटरनेटच्या तंत्रज्ञानापासून भारताला फार काळ दूर ठेवता येणार नाही.'