Coronavirus : वेगवान चाचणीसाठी Reliance नं खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान; मागितली भारतात आणण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 08:17 AM2021-05-07T08:17:36+5:302021-05-07T08:20:13+5:30
Coronavirus In India Reliance Technology : सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद. रिलायन्सनं वेगवान चाचणीसाठी खरेदी केलं इस्रायलकडून तंत्रज्ञान.
गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत सध्या देशात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येताना दिसत आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण जितकं महत्त्वाचं आहे तितकंचं बाधितांची ओळख पटवण्यासाठी चाचण्याही होणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजनं (Reliance Industries) इस्रायलयच्या तज्ज्ञांना भारतात येण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांची ही टीम कोविड-१९ ची (Covid-19) त्वरित ओळख पटवणारी उपकरणं भारतात स्थापित करतील. रिलायन्सनं ही प्राणाली इस्रायलच्या एका स्टार्टअपकडून दीड कोटी डॉलर्सला खरेदी केली आहे.
कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रेथ ऑफ हेल्थच्या (BOH) एका शिष्टमंडळाला रिलायन्सच्या मागणीनंतर आपात्कालिन परिस्थितीत मंजुरी देण्यात आली आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. इस्रायलच्या या कंपनीच्या तज्ज्ञांची टीम भारतातील रिलायन्सच्या टीमला आपल्या प्रणालीबाबत प्रशिक्षण देतील. या प्रणालीद्वारे कोरोनाबाधित लोकांची आणि रूग्णांची सुरूवातीच्या टप्प्यातच ओळख पटवता येईल. ही नवी प्रणाली अवघ्या काही सेकंदाची याची माहिती देते.
संक्रमण शोधण्यात अधिक यशस्वी
रिलायन्सनं जानेवारी २०२१ मध्ये ब्रीथ ऑफ हेल्थ सोबत १.५ कोटी डॉलर्सचा करार केला होता. त्यानंतर रिलायन्सला स्विफ्ट कोविड १९ ब्रीथ टेस्टिंग सिस्टम मिळतील. याअंतर्गत रिलायन्स इस्रायलच्या कंपनीकडून थेट कोरोना व्हायरस टेस्ट किट खरेदी करेली. या अंतर्गत रिलायन्स मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या करू शकेल. दरम्यान, महिन्याला एक कोटी डॉलर्स खर्च करून लाखो लोकांच्या चाचण्याही करणं याद्वारे शक्य आहे. बीओएचनं श्वासोच्छ्वासाद्वारे चाचणी करण्याचं हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. याचं यशस्वी चाचणी करण्याचं प्रमाण ९५ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.