बदनामी खटल्यात राहुल गांधींना तूर्तास दिलासा
By admin | Published: July 28, 2016 12:41 AM2016-07-28T00:41:00+5:302016-07-28T00:41:00+5:30
खासगी फौजदारी बदनामीच्या तक्रारीची चौकशी करण्यास दंडाधिकारी पोलिसांना सांगू शकत नाहीत. तक्रारदाराने स्वत: ते सिद्ध केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.
नवी दिल्ली : खासगी फौजदारी बदनामीच्या तक्रारीची चौकशी करण्यास दंडाधिकारी पोलिसांना सांगू शकत नाहीत. तक्रारदाराने स्वत: ते सिद्ध केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधातील बदनामीच्या खटल्यामध्ये कनिष्ठ न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना चौकशीच्या दिलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाला प्रथमदर्शनी चूक आढळून आली. महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल राहुल गांधी यांनी रा. स्व. संघावर आरोप केला होता, त्याबद्दल बदनामीचा खटला सुरू आहे. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली आहे. नेत्याने संघटनेवर उघडपणे दोषारोप करू नये. गांधींनी त्याबद्दल खेद व्यक्त केला नाही, तर खटल्याला तोंड द्यावे, असे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते.(लोकमत न्यूज नेटवर्क)