गुजरात दंगलीतील दोषी पटेलांची सुटका करावी
By Admin | Published: August 28, 2016 12:28 AM2016-08-28T00:28:21+5:302016-08-28T00:28:21+5:30
गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीदरम्यान विविध प्रकरणांत दोषी ठरविण्यात आलेल्या पटेल समाजाच्या युवकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पटेल आरक्षण
अहमदाबाद : गुजरातमध्ये २००२ च्या दंगलीदरम्यान विविध प्रकरणांत दोषी ठरविण्यात आलेल्या पटेल समाजाच्या युवकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर स्वत:ची धर्मनिरपेक्ष नेता अशी प्रतिमा ठेवू इच्छितात. त्यामुळे ते या युवकांची सुटका होऊ देणार नाहीत, असा आरोपही हार्दिकने केला. त्याने मोदींना एक पत्र लिहीले आहे. यात त्यांनी २००२ च्या दंगलीतील विविध प्रकरणांत जन्मठेप झालेल्या पटेल समाजातील १०२ लोकांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
मोदी २००२ च्या दंगलीच्या जोरावर पुन्हा मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान झाल्याचे सर्वांनाच माहीत आहे, असे हार्दिकने पत्रात लिहिले आहे. या दंगलीला तुम्हीच (मोदी) जबाबदार आहात, असा आरोपही हार्दिक पटेलने केला आहे. हार्दिक सध्या उदयपूर येथे वास्तव्याला आहे. जामीन देताना उच्च न्यायालयाने त्याला राज्याबाहेर राहण्याची अट टाकली होती. हार्दिकवर देशद्रोहाचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)