नेपाळमध्ये अडकलेल्या २०० यात्रेकरूंची सुटका, हेलिकॉप्टरने केल्या ३५ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 04:21 AM2018-07-05T04:21:37+5:302018-07-05T04:23:37+5:30
नेपाळच्या हिल्सा पर्वतीय भागातून भारताच्या २०० मानसरोवर यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. तिबेटमधून परतणारे १,५०० यात्रेकरू मुसळधार पावसामुळे नेपाळच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या संख्येने अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यात आली आहे.
काठमांडू : नेपाळच्या हिल्सा पर्वतीय भागातून भारताच्या २०० मानसरोवर यात्रेकरूंची सुटका करण्यात आली. तिबेटमधून परतणारे १,५०० यात्रेकरू मुसळधार पावसामुळे नेपाळच्या पर्वतीय भागांमध्ये मोठ्या संख्येने अडकले असून, त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यात आली आहे.
भारतीय दूतावासाने सांगितले की, ११९ यात्रेकरूंना सिमीकोटहून सुरखेत येथे सुरक्षित पोहोचवण्यात आले. या भागांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करण्यात येत आहेत. हिल्सा-सिमिकोट सेक्टरमध्ये यात्रेकरूंच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात येत असून, आतापर्यंत हेलिकॉप्टरच्या ३५ फेºया करण्यात आल्या व २०० जणांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.
या कामासाठी चार्टर्ड हेलिकॉप्टरची सेवा घेण्याचाही विचार सुरू आहे. हवामानाची स्थिती कशी राहील, यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. काल १५८ यात्रेकरूंना सिमीकोटहून नेपालगंज येथे नेण्यात आले होते. नेपालगंज हे सुसज्ज असे शहर असून, तेथून रस्त्याच्या मार्गाने लखनौला तीन तासांत पोहोचता येते.
दूतावासाने यात्रेकरू व त्यांच्या कुटुंबियांसाठी हॉटलाईन उपलब्ध करून दिली असून, त्यात तमिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेतील कर्मचारी उपलब्ध आहेत. सिमीकोटमध्ये ५६ वर्षीय लीला नारायणन मंद्रीदथ (केरळ) व तिबेटमध्ये आंध्र प्रदेशच्या सत्या लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह काठमांडू व नेपाळगंजमध्ये नेण्यात आले. (वृत्तसंस्था)
संरक्षण मंत्रालय मदतीस तयार
चेन्नई : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय यात्रेकरूंच्या सुटकेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास संरक्षण मंत्रालय तयार आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. येथील विमानतळावर त्या म्हणाल्या की, यात्रेकरूंना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी विदेश मंत्रालय प्रयत्नशील आहे. संरक्षण मंत्रालयही गरज पडल्यास या कामी मदत करील.