धार्मिक हिंसाचाराच्या व्हिडीओंची भीती वाटते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 03:23 AM2017-12-06T03:23:25+5:302017-12-06T03:23:54+5:30
सलमा... सलमा... अशा हाका मोहसीनभाईनी घातल्यावर जेमतेम १६ वर्षांची एक मुलगी खिडकीत येऊन उभी राहिली. ‘हे बघ प्रेसवाले तुला भेटायला आल्येत’, असे म्हटल्यावर ती येऊन उभी राहिली
संदीप प्रधान
गोध्रा : सलमा... सलमा... अशा हाका मोहसीनभाईनी घातल्यावर जेमतेम १६ वर्षांची एक मुलगी खिडकीत येऊन उभी राहिली. ‘हे बघ प्रेसवाले तुला भेटायला आल्येत’, असे म्हटल्यावर ती येऊन उभी राहिली. सलमा जेमतेम वर्षाची असताना गोध्राकांड घडले. तिची आई, भाऊ व बहीण यांना मारण्यात आले. आजोबांसोबत ती राहते. मात्र व्हॉटसअॅपवर धार्मिक हिंसाचाराचा व्हिडीओ आल्याची चर्चा सुरू होते, तेव्हा तिची छाती धडधडू लागते.
गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला २७ फेब्रुवारी २००२ रोजी लागलेल्या आगीनंतर धार्मिक विद्वेषाने हिंसाचाराचा नंगानाच आरंभला.जवळच असलेल्या संतरामपूर गावात सलमाचे कुटुंब राहत होते. सलमाच्या आईच्या डोक्यात माथेफिरूंनी तलवार घातली. ती १४ दिवस मृत्युशी झुंज दिल्यावर मरण पावली. तिचा भाऊ-बहीण यांना जमावाने बेदम मारले आणि नंतर पोटाला दगड बांधून विहिरीत फेकून दिले.
जेमतेम वर्षाच्या सलमाला कुणी तरी जमावाच्या तावडीतून वाचवले. आज ती १६ वर्षांची आहे. दंगलीतील अमानुषतेच्या, क्रौर्याच्या, रक्तपाताच्या कहाण्या तिने ऐकल्या आहेत. लोक मारतील, या भीतीने आजोबांनी सलमाला शाळेत पाठवले नाही. ती घरकाम करते, आजोबा मोलमजुरीची छोटी-मोठी कामे.
इरफानही भेटला. त्याच्या कुटुंबाच्या मालकीची दोन-तीन घरे होती. त्यावेळी तो १७ वर्षांचा होता. तो म्हणाला : मृत्यू समोर उभा ठाकला होता. अल्ला की मेहरबानी म्हणून वाचलो. पण सारे गमावले आणि दारिद्र्य व अपार कष्ट नशिबी आले. निवडणुका आल्या की आम्हा तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. कोण काय करेल, याची चिंता लागून असते. बुºहाणपुºयातील मोहसीन म्हणाला : माझ्या आईचे कपड्याचे दुकान होते. वडिलांच्या दोन रिक्षा होत्या. सारे दंगलीत खाक झाले. सरकारने फुटक्या कवडीची मदत केली नाही.
इरफानची बहीण इकरा येऊन बाजूला उभी राहिली. दंगल झाली तेव्हा ती सहा महिन्यांची होती. राजकारणामुळे आयुष्ये बरबाद झाली. निवडणुका आल्यावर नेते व पत्रकार यांना आमची आठवण येते आज इतकी वर्षे खस्ता खात आहोत. पण कुणीही आमच्या समस्या सोडवत नाही, असे ती म्हणाली.
दोन्ही पक्षांना केले दूर
गोध्रा रेल्वे स्टेशन परिसरातील अपक्ष नगरसेवक इलियास भेटले. ते म्हणाले की, आजही रेल्वे जाळल्याच्या प्रकरणात ३५ जण जेलमध्ये आहेत. त्यांच्या बायका मोलमजुरी करतात. हायकोर्टाने ३१ जणांना जन्मठेप दिली आहे. गोध्रातून आजपर्यंत हिंदू उमेदवारच विजयी होत आला असून मुस्लिमांची मते त्याला मिळत आली आहेत. गेली २० वर्षे येथील नगरपालिका भाजपाकडे होती. मात्र विकास झाला नाही. यावेळी २३ अपक्ष निवडून आले. त्यामध्ये १८ मुस्लीम व पाच हिंदू. भाजपा व काँग्रेसला बाजुला ठेवून अपक्षांनी सत्ता स्थापन केली आहे, असे इलियास म्हणाले.
काळेकुट्ट ढग
गुजरातकडे सरकणाºया
‘ओखी’ चक्रिवादळाच्या इशाºयामुळे गोध्रा शहराच्या परिसरातही काळेकुट्ट ढग दाटलेले होते... पण भीतीचे, दहशतीचे आणि सोशल मीडियावरील विकृत प्रचाराचे.
किसीसे कुछ नही बोलना
गोध्रा रेल्वे स्थानकाकडे आलो. बैठी कुबट गोदामे, भंगार सामानाचे रचलेले सांगाडे, धूळ ओकणारे रस्ते, माणसांनी गजबजलेला परिसर असे चित्र होते.
बाकावर महंमद युनूस बसले होते. ‘हे प्रेसवाले भेटायला आले आहेत,’ असे सांगताच त्यांनी हात जोडले. त्यांच्या डोळ््यात टचकन पाणी उभे राहिले.
‘भाईसाब, सोलह साल हो गए, वही कहानी बताते बताते. सब बरबाद हुआ. अब किसीसे कुछ नही बोलना.’ त्यांची दोन गेस्ट हाऊस दंगलीत पूर्णपणे नष्ट झाली. त्यांच्या भावाला जन्मठेप झाली. ‘प्रेसवाले हो कुछ चाय-थंडा लोगो,’ असे विचारायला मात्र महंमद युनुस विसरले नाहीत.
केवळ विटांची ही घरे
दंगलीत उद्ध्वस्त झालेल्यांसाठी मुस्लीम समाजातील मंडळींनी एकत्र येऊन गोध्रापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर अमन पार्क, बिल्कीस सोसायटी ही एकमजली घरांची वसाहत उभी केली आहे.
केवळ विटांची ही घरे. आजूबाजूला कचरा, उघडी गटारे, घोंघावणाºया माशा असे ओंगळवाणे चित्र.