रखडलेल्या प्रकल्पांना यापुढे मुदतवाढ नाही
By admin | Published: April 4, 2015 05:18 AM2015-04-04T05:18:27+5:302015-04-04T05:18:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याची गंभीर दखल घेतली आहे. काही प्रकल्पांच्या कामांना झालेला विलंब पाहता
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याची गंभीर दखल घेतली आहे. काही प्रकल्पांच्या कामांना झालेला विलंब पाहता प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास आणखी १२ वर्षांचा (१४४ महिने) कालावधी लागू शकतो. वेळेत पूर्ण होऊ न शकणाऱ्या या प्रकल्पांवरील वाढलेला खर्च सुमारे २० हजार कोटींच्या घरात आहे. मोदींनी प्रकल्पांच्या कूर्मगतीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून, यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही प्रकल्पाला विलंब होता कामा नये, असा आदेश पंतप्रधानांनी दिला आहे. यापुढे या प्रकल्पांना कोणत्याही परिस्थितीत आणखी मुदतवाढ मिळणार नाही, असे मोदींनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना आणि केंद्र सरकारच्या सचिवांना बजावले आहे. केंद्रात आणि राज्यात संपुआचे सरकार असतानाही महाराष्ट्रात प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात झालेल्या विलंबाबद्दलही मोदींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
देशभरात बहुराज्यीय संबंधातील ६१ प्रकल्प प्रलंबित असून, त्यातील फक्त महाराष्ट्राशी संबंध असणाऱ्या किंवा महाराष्ट्रातून जाणाऱ्या २६ प्रकल्पांची अंमलबजावणी होऊ न शकल्याने (तक्त्यात नमूद) विलंबामुळे खर्चात आणखी २० हजार कोटींनी वाढ होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकारी खजिन्यावर १ लाख १० हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. बेलापूर-सीवूड अर्बन विद्युत दुहेरी रेल्वेमार्गाच्या खर्चात ३५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा प्रकल्प २००४ मध्येच पूर्ण व्हायला हवा होता. मोदींनी आता मार्च २०१६ ही मुदत घालून दिली आहे. मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प (अर्बन ट्रान्सपोर्ट) २ आता मार्च २०१९ साली पूर्ण केला जाणार असून, त्याच्यावरील अंतिम खर्च ६ हजार ८२१ कोटी रुपये असेल.
विलंब होणाऱ्या प्रकल्पांच्या यादीत सर्वाधिक पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचे २८ प्रकल्प असून, वाढलेली किंमत ५३ हजार कोटींच्या घरात जाईल.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या १२ प्रकल्पांवरील वाढीव खर्च १४ हजार कोटींच्या घरात आहे.