7 वर्षांनंतर 'त्या' दोन जोडप्यांनी पुन्हा केलं लग्न; मुलं झाली वऱ्हाडी तर पोलिसांनी केलं कन्यादान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 04:06 PM2022-06-11T16:06:00+5:302022-06-11T16:07:11+5:30
पोलीस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले. या अनोख्या लग्नात दोन मुलं देखील सहभागी झाली होती.
नवी दिल्ली - राजस्थानच्या जोधपूरमध्ये एका अजब लग्नाची गजब गोष्ट समोर आली आहे. तब्बल सात वर्षांनी दोन जोडप्यांनी लग्न केलं. विशेष म्हणजे त्यांची मुलं देखील या लग्नाला उपस्थित होती. तर पोलिसांनी कन्यादान केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये पोलीस ठाण्यात दोन जोडप्यांचं धुमधडाक्यात लग्न करण्यात आलं आले. पोलीस स्टेशनबाहेर वाजत गाजत वऱ्हाडी मंडळी जमली होती. पोलिसांच्या समोरच सप्तपदी घेण्यात आले. या अनोख्या लग्नात दोन मुलं देखील सहभागी झाली होती.
दोन जोडप्यांमध्ये एका छोट्याशा कारणावरून वाद झाला होता. पुढे तो वाद टोकाला गेला आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं. त्यांच्यातील वाद मिटवला आणि पुन्हा एकदा पोलीस ठाण्यातच त्याचं लग्न लावून दिलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये दोन कुटुंबीयांनी आपल्या मुलींचं लग्न केलं होतं. देवतडा येथे राहणाऱ्या कंवराराम यांचा मुलगा गिरधारीराम याचं लग्न अरटिया खुर्द येथील जीवनरामची मुलगी उषा हिच्यासोबत झालं.
उषाचा भाऊ विशनारामसोबत गिरधारीरामची बहीण धारू हिचं लग्न देखील तेव्हाच झालं. काही कौटुंबिक वादामुळे दोन्ही कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाला. एक वर्षापूर्वी उषा आपल्या घरी परत आली तर धारू देखील तिच्या घरी निघून गेली. हे प्रकरण पुढे पोलिसांत गेलं. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही जोडपी आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजावलं. मुलांच्या भविष्यासाठी एकत्र राहणं किती गरजेचं आहे ते सांगितलं. यानंतर दोन्ही कुटुंब तयार झाली आणि पुन्हा एकदा सात वर्षांनी त्यांचं लग्न लावण्यात आलं. या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.