Remdesivir injection : मोठी बातमी! येत्या ४-५ दिवसात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार; कोविड-19 टास्क फोर्सची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:15 PM2021-04-15T18:15:29+5:302021-04-15T18:50:17+5:30
Remdesivir injection CoronaVirus News & Latest Updates : रेमडेसिविरचा काळा बाजार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांन रेमडेसिविरबाबत माहिती दिली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येनं लोकांना संक्रमण झालं आहे. मुंबई, पुण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा पडत आहे. नातेवाईकांना रेमडेसिविर देण्यासाठी लोकांना मेडिकलच्या बाहेर लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. तसंच रेमडेसिविरचा काळा बाजार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दरम्यान राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांनी रेमडेसिविरच्या पुरवठ्याबाबत माहिती दिली आहे.
पुढच्या चार ते पाच दिवसात म्हणजेच १७ ते २० एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात राज्यात रेमेडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील, असा दिलासा डॉ. लहाने यांनी दिला आहे. त्याशिवाय रेमेडिसिवीरचा काळाबाजार होऊ नये म्हणून नियंत्रण कक्ष कृत्रिम टंचाई टाळण्यासाठी सर्तक आहेत. याच्या किंमतीवर राज्यसरकार नियंत्रण आणू शकणार नाही, हे ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाच्या म्हणजेच केंद्राच्या अखत्यारीत येतं. रेमेडेसिवीर 17 तारखेनंतर मिळायला सुरुवात होईल आणि 20 एप्रिलपर्यंत लोकांची तक्रार राहणार नाही असा विश्वास राज्याच्या कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला.
पुढे त्यांनी सांगितले की, ''सध्या राज्यात मोठ्या स्तरावर RTPCR चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे वैद्यकिय यंत्रणावरचा ताण वाढत आहे. परिणामी कोरोना चाचणीचे रिपोर्ट उशीरा मिळत आहेत. खाजगी लॅब क्षमतेपेक्षा अधिक नमुने घेत आहेत, त्यामुळे 24 तासांत रिपोर्ट देणं शक्य होत नाहीये. त्यांना क्षमता वाढवा किंवा क्षमते एव्हढेच नमुने घ्या, असंही त्यांना सांगण्यात आलं आहे. याशिवाय राज्यात चाचणी किटचा तुटवडा नाही.''
लस घेतली तरी कोरोना होतोच, मग कशासाठी घ्यायची लस?; डॉ. संजय ओक यांनी सांगितले अनुभवाचे बोल
''सद्यस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाने मृत्यू होत असलेल्यांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोरोना वाढण्याआधीच थांबवायला हवं लक्षणं दिसत असल्यास त्वरित कोविडची चाचणी करून घ्यायला हवी. अनेकजण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत दगावत आहेत. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे.'' असंही डॉ. लहाने यांनी सांगितले.
भारतात ४ ते ६ परदेशी कोरोना लसी येणार; जाणून घ्या किंमत किती असणार
रेमडेसीवीर बनविणारी कंपनी दोन दिवसांपासून बंद
देशात रेमडेसीवीर लस बनविणाऱ्या ७ कंपन्या आहेत. यापैकी एक मोठी कंपनी असलेली हैदराबादची हेट्रो फार्मा (hetero pharma) ही कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे लसीची मोठी गरज असताना ही कंपनी बंद राहिल्याने याचा फटका लसीच्या पुरवठ्यावर झाला आहे. या कंपनीचा हैदराबादचा प्लांट बंद आहे. ही एकटी कंपनी दररोज ३२ हजार लसी तयार करते. गेले दोन दिवस सुटी असल्याने या कंपनीचे उत्पादन ठप्प झाले होते. अन्य सहा कंपन्या दिवसाला ३० हजार इंजेक्शन बनवितात. या कंपन्यांकडूनेखील महाराष्ट्राला पुरवठा होतो. मात्र, आज दिवसभरात एकही रेमडेसीवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळालेले नाहीय. (No Single Remdesivir given to Maharashtra today.)
पुण्यात जी लस उपलब्ध झालीय ती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या पातळीवर मिळविलेली आहेत. पुण्यासाठी रेमडेसिविर उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्नशील असून रात्री उशिरापर्यंत दिल्ली येथून थेट विशेष फ्लाईटने काही प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पुण्यात येणार होता. मात्र तो आज दुपारी दाखल झाला.
कोणकोणत्या कंपन्या हे इंजेक्शन बनवितात...
हेट्रो ड्रग्ज, झायडस कॅडिला, सिप्ला, डॉ. रेड्डीज, व्हायट्रीस, बायोकॉनची उपकंपनी सिंजीन इंटरनॅशनल आणि ज्युबिलंट फार्मोव्हा या सात कंपन्या रेमडेसीवीर इंजेक्शन बनवितात.