याद रखो कुर्बानी... कॅप्टन दर्जाचा अधिकारी शहीद; एका दहशतवाद्याचा खात्मा; एक नागरिक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 05:50 AM2024-08-15T05:50:11+5:302024-08-15T05:50:42+5:30
जम्मू-काश्मीरमधील दोडा-किश्तवार या भागातील गेल्या काही दिवसांतील ही चौथी चकमक आहे.
जम्मू: जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत बुधवारी लष्करातील एक कॅप्टन शहीद झाले, तसेच एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत एक नागरिकही जखमी झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील दोडा-किश्तवार या भागातील गेल्या काही दिवसांतील ही चौथी चकमक आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी ही चकमक सुरू झाली. जम्मू क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण तसेच त्यांच्याशी होणाऱ्या चकमकींचे प्रमाण वाढले आहे. त्यात या घटनेची भर पडली आहे. दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली. तेथील शिवगड असर या पट्टयातील जंगलक्षेत्रात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घातला. बुधवारी सकाळी चकमकीत लष्करातील कॅप्टन दीपक सिंह हे गंभीर जखमी झाले. लष्कराच्या रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या रविवारी झाल्या दोन चकमकी गेल्या रविवारी किश्तवाड येथील नौनाट्टा येथील जंगल आणि उधमपूरचा बसंतगढ परिसरात दोन चकमकी झाल्या होत्या. मात्र, तिथून दहशतवाद्यांनी पलायन करून दोडा जिल्ह्यात प्रवेश केला होता. पाकिस्तानातील जैश-ए- मोहम्मद या संघटनेचे सदस्य असलेले तीन दहशतवादी २६ जून रोजी दोडा जिल्ह्यातील गंदोह या भागात झालेल्या चकमकीत ठार झाले होते.
घनदाट जंगलातून दहशतवादी दोडामध्ये आले या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली. घटनास्थळावरून सुरक्षा जवानांनी रक्ताने माखलेल्या चार सॅक तसेच एम-४ कार्बाईन्सदेखील जप्त केली आहे. उधमपूर जिल्ह्यातील पटणीटॉप येथून घनदाट जंगलातून मार्ग काढत हे दहशतवादी दोडामध्ये दाखल झाले होते. मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता सुरक्षा जवान व दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाली ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुन्हा दहशतवाद्यांचा शोध सुरू झाला. त्यावेळी चकमकीत कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले.