विलासरावांची आठवण येतेय!, अण्णा हजारेंनी दिली ‘लोकमत’कडे प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:30 AM2018-03-26T00:30:56+5:302018-03-26T00:30:56+5:30
ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक रामलीला मैदानावर कुणाला मिस करत असतील?
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक रामलीला मैदानावर कुणाला मिस करत असतील? ते आहेत दिवगंत काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. अण्णांच्या तत्कालीन आंदोलनामुळे झालेले ‘डॅमेज कंट्रोल’ विलासरावांनी चातुर्याने केले होते. अण्णा पुन्हा दिल्लीत आहेत, परंतु ना सरकारला त्यांची दखल घेतली ना प्रसारमाध्यमांनी! त्या पार्श्वभूमीवर ‘विलासरावांना मी मिस करतोय, पण आज आठवून काय उपयोग?’, अशी भावना अण्णांनी व्यक्त केली.
‘लोकमत’कडे अण्णा म्हणाले, त्यावेळी विलासराव आले होते. त्यांनी पक्षालाही काही मुद्दे पटवून दिले होते; पण त्यांच्या पक्षाने (काँग्रेस) विलासरावांकरवी मला दिलेला शब्द पाळला नाही. प्रत्येक राज्यात लोकपाल नेमू- असे आश्वासन काँग्रेसने दिले होते.. माझ्याकडे तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्वाक्षरीचे पत्रही आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत छेडलेल्या आंदोलनास तिसºया दिवशी रविवार असूनही थंड प्रतिसाद मिळाला. रामलीला मैदानावरच झालेल्या या आधीच्या ऐतिहासिक आंदोलनात सहभागी झालेले अण्णासमर्थक आज निराश आहेत. त्यांचीही हीच भावना आहे की विलासराव असते तर चित्र वेगळे असते!
अण्णा यांचा आंदोलनाचा रविवारी तिसरा दिवस होता. देशभरातून अण्णासमर्थक रामलीला मैदानावर दाखल होत आहेत. अण्णांच्या तब्येतीवर उपोषणाने परिणाम होत आहे. रविवारी ४ किलो वजन घटले असून, रक्तदाब कमी-अधिक होत असल्याचे डॉ.धनंजय पोटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आंदोलन सुरू होवून तीन दिवस झालेत. सरकारकडून अद्याप कुणीही चर्चेसाठी आले नाही. आले तरी आमच्याकडून कोण चर्चेला जाणार हे निश्चित नाही. त्या क्षमतेचा माणूस आमच्याकडे नसल्याची खंत- अण्णा समर्थकाने नोंदवली. संसद अधिवेशन सुरू आहे, परंतु आमची दखल घेण्यात आली नाही. शिवाय या आठवड्यात गुरूवारुपासून सलग चार दिवस सुट्या आहेत. त्यामुळे जो काही निर्णय व्हायचा आहे तो बुधवारपर्यंत होण्याची आशा, आंदोलनाच्या नियोजनकर्त्यांनी व्यक्त केली.
सरकारशी चर्चा कोण करणार?
अण्णांच्या 'कोअर टीम'मध्ये २४ जण आहेत. त्यापैकी कल्पना इनामदार, विनायक पाटील, शिवाजी खेडकर व राम नाईक वगळता सर्व अमराठी आहेत. महाराष्ट्रात हे चेहरे परिचित असले तरी दिल्लीत छाप पाडण्यात असमर्थ आहेत. यापूर्वीच्या आंदोलनातील अण्णांची दिल्लीतील साथीदार अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रा.योगेंद्र यादव आजच्या घडीला राजकारणात आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपशी कायदा-नियमांवर बोट ठेवून चर्चा करू शकेल असा एकही व्यक्ती आमच्याकडे नाही- अशा शब्दात अण्णांच्या कार्यकर्त्याने आपली भावना 'लोकमत'कडे व्यक्त केली.
1रविवारी तीन आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. रामलीला मैदानाच्या प्रत्येक प्रवेशद्वारापाशी अहोरात्र रूग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या आहेत.
2रामलीला मैदानावर मात्र रविवारी दोन गट पडले होते. एका बाजूला आंदोलनकर्ते तर दुसºया बाजूला रामभक्त! मैदानात निम्म्यापेक्षा जास्त जागा आंदोलनकर्त्यांना देण्यात आली आहे. उर्वरीत भागात रामजन्मसोहळा साजरा होत होता.
3दिवसभर वेगवेगळ््या संस्था, संघटनांचे प्रतिनिधी अण्णांना भेटायला येत आहेत. दिवसभर अण्णा व्यासपीठावर बसून असतात. अधूनमधून पोलीस चौकशीसाठी येतात.
4 दुपारी सव्वादोन वाजता अतिरिक्त पोलीस आयुक्त अँन्टो अल्फान्सो यांनी भेट घेतली. व्यासपीठालगतच मागे उभारलेल्या लोखंडी पलंगावर अण्णा बसले. अल्फान्सो यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.