‘रिमोट कन्ट्रोल’मुळे देशाचे नुकसान झाले!
By admin | Published: April 9, 2016 01:01 AM2016-04-09T01:01:24+5:302016-04-09T01:01:24+5:30
‘बॅकसिट ड्रायव्हिंग’ आणि ‘रिमोट कन्ट्रोल’मुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला
राहा (आसाम) : ‘बॅकसिट ड्रायव्हिंग’ आणि ‘रिमोट कन्ट्रोल’मुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राज्यात अस्थिर सरकार स्थापन होऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी आसामच्या जनतेला दिला.
राहा येथे निवडणूक प्रचार सभेत मोदी बोलत होते. राज्यात स्पष्ट बहुमताने भाजपाप्रणीत आघाडी सरकार निवडून द्या आणि आसाममध्ये राजकीय अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या व विकासाचा मार्ग अवरुद्ध करणाऱ्या श्क्तींचा पाडाव करा, असे आवाहन त्यांनी केले. ‘आपले सरकार बोलण्याऐवजी कृती करीत होते,’ या डॉ. मनमोहनसिंग यांच्या विधानाचा समाचार घेताना मोदी म्हणाले, ‘ते खरेच बोलले. त्यांच्या काळातील घोटाळे आता बोलू लागले आहेत. वाचेपेक्षा काम बोलत असते, असे मनमोहनसिंग म्हणतात. हे खरे आहे. पाप बोलते. आता सर्व काही उघड होत आहे. त्यामुळे सर्व घाबरले आहेत.
कामाख्य मंदिरात प्रार्थना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराला जाण्यापूर्वी शुक्रवारी गुवाहाटीच्या निलांचल पर्वतावरील कामाख्य देवीच्या मंदिरात पूजाअर्चा केली.