भ्रष्टाचाराची प्रकरणे त्वरित निकाली काढा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 10:19 PM2015-08-18T22:19:53+5:302015-08-18T22:19:53+5:30
भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून, अशी प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश केंद्रीय दक्षता
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करून, अशी प्रकरणे त्वरित निकाली काढण्याचे निर्देश केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) आपल्या अखत्यारीतील सर्व विभागांना दिले आहेत.
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्याकडे अगोदर लक्ष द्यायला पाहिजे आणि या संदर्भात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल, असे सीव्हीसीने सर्व मंत्रालये, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपन्या व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांसाठी पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
प्रलंबित असलेले चौकशी अहवाल, जागल्यांकडून (व्हिसल ब्लोअर्स) मिळालेल्या तक्रारी, दंडाबाबत आपण केलेल्या सूचनांची अंमलबजावणी आणि विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे असलेल्या प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर सीव्हीसीने हे निर्देश दिले. ‘अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यात प्रचंड विलंब होत असल्याचे दिसून आले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेली प्रकरणे ताबडतोब निकाली काढण्यात यावी, असे आयोगाला वाटते,’ असे या परिपत्रकात म्हटले आहे.
आपापल्या विभागांतील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना जलद गतीने निपटारा करण्यासाठी योजना तयार करावी, असेही सीव्हीसीने मुख्य दक्षता अधिकाऱ्यांना सांगितले आहे. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला की नाही याचा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आढावा घेण्यात येईल, असेही सीव्हीसीने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)