वातावरण बदल, ऊर्जा संकटावर तोडगा काढा
By admin | Published: February 23, 2016 03:01 AM2016-02-23T03:01:22+5:302016-02-23T03:01:22+5:30
वातावरण बदल, ऊर्जा संकट आणि जीवघेण्या आजारांवर तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) दीक्षांत समारंभात बोलताना विद्यार्थ्यांना केले.
वाराणसी : वातावरण बदल, ऊर्जा संकट आणि जीवघेण्या आजारांवर तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस हिंदू विद्यापीठाच्या (बीएचयू) दीक्षांत समारंभात बोलताना विद्यार्थ्यांना केले.
विद्यार्थ्यांनी केवळ कट- पेस्टवर विश्वास न ठेवता सृजनात्मक कार्य आणि संशोधनावर भर देत जगासमोरील आव्हानांना सामोरे जावे. औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतरही ग्रहणशीलता आणि नवे ज्ञान मिळविण्यासाठी उत्सुक असावे.
देशातील युवक आणि महिलांसमक्ष मी आव्हान हे ठेवत आहे. जागतिक तापमान थोडे कमी करण्यासाठी मदत होईल किंवा भीषण ऊर्जा संकटावर मात करता येईल असे संशोधन त्यांनी समोर आणावे.
नवीकरणाचे किंवा सातत्यपूर्ण पर्यायी स्रोत शोधले जात नसेल तर मानवतेसमोर मोठे संकट उभे ठाकले जाऊ शकते. देश आणि जगासमोरील समस्यांवर तोडगा काढण्याचे स्वप्न बघितले जावे, असे ते सोमवारी विद्यार्थी आणि बीएचयूचे शिक्षणतज्ज्ञांना संबोधित करताना म्हणाले. (वृत्तसंस्था)
घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण....
बीएचयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीबद्दल घोषणा देणाऱ्या आशुतोष सिंग या विद्यार्थ्याला भाजप कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्यामुळे या समारंभात काही काळ तणाव निर्माण झाला.
मोदी भाषण संपवून जात असताना आशुतोषने घोषणा दिल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला.
मानद पदवीस नकार...
1 मोदींनी सोमवारी बीएचयूची मानद डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यास नकार दिला. त्यासंबंधी प्रस्ताव मी नम्रपणे नाकारत आहे, असे त्यांनी दिलगिरी व्यक्त करताना म्हटले. बनारस हिंदू विद्यापीठाला भेट देणे ही बाबच माझ्यासाठी अभिमानाची आहे. डॉक्टरेट प्रदान करण्याबाबत मला विद्यापीठाकडून पत्र मिळाले होते.
2 मी नम्रपणे त्याला नकार दिला. मी अशा बाबींपासून स्वत:ला दूर ठेवणे चांगले राहील, असे मला वाटते. या विद्यापीठाचे कुलपती, कुलगुरूंनी माझी त्यासाठी निवड केल्याबद्दल मी आभारी आहे, असेही मोदींनी दीक्षांत समारंभात म्हटले.