'मोदी हटाओ, देश बचाओ'; दिल्लीत बॅनर झळकताच पोलीस कारवाई,100 FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:20 AM2023-03-22T11:20:46+5:302023-03-22T11:23:34+5:30
सेंट्रल दिल्लीच्या दिनदयाल मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचे पोस्टर चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत कुणीतरी मोदी हटाओ, देश बचाओ अशी पोस्टरबाजी केली. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी १०० जणांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहेत. दिल्लीच्या अनेक परिसरात असे बॅनर झळकले असून त्याचे फोटोही सोशल मीडियातून समोर आले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शक्यतो जे डिजिटल बॅनर झळकतात, त्या बॅनरवर प्रिंटींग प्रेसचे नाव असते, पण या झळकलेल्या बॅनरवर प्रिंटींग प्रेसचे नाव नाही. माध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार याप्रकरणी ६ जणांना ताब्यातही घेण्यात आलंय.
सेंट्रल दिल्लीच्या दिनदयाल मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचे पोस्टर चिकटवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी रात्री उशिरा याप्रकणी ताब्यात घेतलेल्या लोकांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी, एका राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन हे बॅनर लावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी यात कारवाई केल्याची माहिती मिळताच, विरोधकांना संसदेत हल्लाबोल केला. आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांनी लिहिले आहे की, ''मोदी सरकार तानाशाही के चरम पर है, ये वह पोस्टर है, जिसपे १०० एफआयआर हो गई है'', असे सिंह यांनी ट्विटरवरुन म्हटलंय.
दरम्यान, आम आदमी पक्षाच्या ट्विटर हँडलवरुन पोस्टरवरील शब्द शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये असे काय आपत्तीजनक आहे की, जे लावण्यात आल्याने मोदींनी १०० एफआयआर केले आहेत ? PM मोदी तुम्हाला हे माहिती नसेल की, भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. एका पोस्टरची एवढी भीती कशासाठी?, असा सवाल आम आदमी पक्षाने विचारला आहे. दरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी २ हजार पोस्टर चिकटवले होते. तर, आणखी तेवढेच पोस्टर्स त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.