दुचाकींच्या नंबर प्लेटमधून ‘SEX’ शब्द काढणार; सरकारचे RTO ला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 06:11 AM2021-12-06T06:11:52+5:302021-12-06T06:12:18+5:30
दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस अक्षर असते. एस अक्षर असलेला नंबर दुचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट होते
नवी दिल्ली : दिल्लीतील दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये एसईएक्स (सेक्स) शब्द येत आहे. या शब्दाला एका तरुणीने आक्षेप घेतल्याने दिल्ली सरकारने हे शब्द असलेली वाहन क्रमांकाची सिरीज मागे घेतली आहे.
दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस अक्षर असते. एस अक्षर असलेला नंबर दुचाकी वाहनाचा असल्याचे स्पष्ट होते. सध्या दिल्ली परिवहन विभागाकडून वाहनांच्या नंबरची सिरीज ‘ईएक्स’ या अक्षरांनी सुरू आहे. दुचाकीचा क्रमांक असल्याचा एस या अक्षरानंतर ईएक्स येत आहे. ही तिन्ही अक्षरे एकत्र लिहिल्या जात असल्याने सेक्स (एसईएक्स) अशी अक्षरे दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर येतात.
सरकारचे परिवहन विभागाला निर्देश
एका तरुणीच्या दुचाकी वाहनांवर हा शब्द आल्याने तिला शेरेबाजी ऐकावी लागली. तिने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार करून हा नंबर बदलून देण्याची मागणी केली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी तात्काळ या तक्रारीची दखल घेऊन परिवहन विभागाला या सिरीजचे नंबर देणे त्वरित थांबविण्याचे आदेश दिले, तसेच या सिरीजचे नंबर किती वाहनांना देण्यात आले, याची माहिती तात्काळ द्यावी, असे निर्देश स्वाती मालीवाल यांनी परिवहन विभागाला दिले.