DGP पदावरुन हटवलं, गावाकडं जाऊन शेती करणार आयपीएस अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 05:25 PM2021-02-21T17:25:30+5:302021-02-21T17:26:01+5:30
राव यांना डीजीपी पदावरुन हटविल्यानंतर नीरज सिन्हा यांना राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारचा हा निर्णय न रुचल्याने एमव्ही राव यांनी आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रांची - झारखंडचे डीजीपी राहिलेल्या एमव्ही राव यांनी आयपीएस पदाची मोठी नोकरी करुन गावाकडं जाण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीतून व्हीआरएस घेऊन आंध्र प्रदेशातील आपल्या विजयवाडा या गावी जाऊन पूर्वजांची जमीन कसण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे. धडाकेबाज आयपीएस अधिकारी राहिलेले एमव्ही राव हे राज्याचे प्रभारी डीजीपी म्हणून कार्यरत होते. गेल्या 11 महिन्यांपासून ते राज्याचे प्रमुख बनून काम पहात होते. मात्र, 11 फेब्रुवारी रोजी त्यांना या पदावरुन हटविण्यात आले.
राव यांना डीजीपी पदावरुन हटविल्यानंतर नीरज सिन्हा यांना राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले आहे. मात्र, राज्य सरकारचा हा निर्णय न रुचल्याने एमव्ही राव यांनी आपल्या नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राव यांची अजून 6 महिने नोकरी शिल्लक आहे. बिहारच्या जहानाबाद येथे एएसपीपासून ते झारखंडचे पोलीस महासंचालक पदापर्यंत राव यांनी सेवा बजावली. एमव्ही राव यांनी आपल्या 34 वर्षांच्या सेवेत बिहारमध्ये भागवत झा आझाद, जगरनाथ मिश्रा, लालू प्रसाद यादव यांच्यापासून ते विद्यमान हेमंत सोरेन सरकारमध्येही अनेक महत्त्वपूर्ण पदांवर सेवा बजावली. मात्र, याच महिन्यात त्यांना डीजीपी पदावरुन हटविण्यात आले आहे.
डीजीपी पदावरु हटविण्यात आल्यानंतर राव यांनी अद्यापही मीडियासमोर आपली भूमिका मांडली नाही. मात्र, आजतक या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बिहारचं भरभरुन कौतुक केलं. तसेच, आपल्या कार्यकाळात कमी मनुष्यबळ, जुनीच हत्यारं आणि जुन्या गाड्यांचा उल्लेख करत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.