NRCतून नाव काढणं म्हणजे मतदार यादीतून नाव हटवणं नाही; निवडणूक आयोगाची 'गुगली'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 09:18 PM2018-08-01T21:18:42+5:302018-08-01T21:27:31+5:30
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून त्याचे नाव हटवल्याचा अर्थ होत नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच जवळपास 40 लाख लोकांचं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीतून नाव हटवलं होतं. त्यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
एनआरसीतून नाव काढणे म्हणजे मतदार यादीतून नाव हटवलं असं होत नाही, अशा प्रकारचा अर्थ कोणीही काढू नये, असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. एनआरसीचा एक मसुदा आहे. पुढच्या महिन्याभरात या सर्व 40 लाख लोकांना त्यांचं नावाचा समावेश का केला नाही, याचं कारण सांगितलं जाईल. तसेच ज्याचं नाव NRCतून हटवण्यात आलं आहे, ते ट्रिब्युनलमध्ये स्वतःचे आक्षेप आणि दावे दाखल करू शकतील. त्यानंतर एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर केला जाईल. आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी पुढच्या महिन्यात एनआरसीच्या मसुद्यावर अहवाल देणार आहेत.
एनआरसीतून नाव हटवल्याचा अर्थ असा नाही की त्यांचं नाव आसाममधल्या मतदार यादीतूनही हटवलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार, मतदाराची नोंदणी करण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यात अर्जदारानं भारतीय नागरिक असणं, वय वर्षं 18च्या वर असणं आणि संलग्न विधानसभा मतदारसंघात नाव असणं या गोष्टींचा समावेश आहे. तसेच मतदार यादी आणि एनआरसीची यादी बनवण्याचं काम हे वेगवेगळं आहे. तसेच आसामचे निवडणूक अधिका-यांना याचा अहवाल लवकरात लवकर देण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे 4 जानेवारी 2019ला मतदार यादीचा अंतिम मसुदा पूर्ण केला जाईल.