तबल्याचे बोल स्तब्ध; ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालवश, अमेरिकेत अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 06:41 IST2024-12-16T06:39:21+5:302024-12-16T06:41:31+5:30

कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते.

renowned padma vibhushan ustad zakir hussain passes away in america at the age of 73 | तबल्याचे बोल स्तब्ध; ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालवश, अमेरिकेत अखेरचा श्वास

तबल्याचे बोल स्तब्ध; ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालवश, अमेरिकेत अखेरचा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आपल्या जादुई तबला वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक, संगीतकार आणि तालतज्ज्ञ, जागतिक पातळीवरचे ख्यातकीर्त, पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन (७३) यांचे रविवारी निधन झाले. त्याच्यावर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

हुसेन यांना हृदयाशी संबंधित समस्या जाणवू लागल्याने गेल्या आठवड्यातच सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात होते, अशी माहिती त्यांचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी दिली. 

त्यांच्या पश्चात पत्नी कथक नृत्यांगना अँटोनिया मिनेकोला, मुली अनीसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी, भाऊ तौफिक कुरेशी, फजल कुरेशी आणि जगभरात विखुरलेला शिष्य परिवार आहे.

उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांचे वडील उस्ताद अल्ला रक्खा खाँ यांच्याकडेच त्यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून तबल्याचे धडे गिरवले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा जाहीर वादन केले.

संगीत क्षेत्रात रचले अनेक इतिहास 

- कौशल्यपूर्ण वादनाने आणि बुद्धिमत्तेमुळे ते भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वादकांसाठी एक ‘सर्जनशील’ साथीदार होते. याबरोबरच झाकीर यांनी जाझ आणि जागतिक संगीतातही आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक प्रसिद्ध वादकांसोबत जगभरात कार्यक्रम केले तसेच एकलवादनही केले. 

- जॉन मॅकलॉघ्लिन, एल. शंकर आणि टी.एच. विनयक्रम यांच्याबरोबर त्यांनी ‘शक्ती बँड’ स्थापन करून संगीत क्षेत्रात इतिहास रचला. त्यांनी जगविख्यात दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत दिलं, तसंच काही चित्रपटांत अभिनयही केला. 

- उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते.

उस्ताद अल्ला रखा यांचे सुपुत्र व सच्छिष्य असलेल्या झाकीर हुसेन यांनी तबल्याला जागतिक पातळीवर नेले. प्रयोगशीलता, कठोर परिश्रम, सशक्त वादन शैली व अंगभूत प्रतिभेमुळे झाकीर हुसेन यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील जाणकार आणि जनसामान्य श्रोते अश्या दोघांनाही आपल्या अभूतपूर्व तबला वादनाने मंत्रमुग्ध केले. त्याचे तबला वादन ऐकून लाखो युवक युवती तबला वादनाकडे वळले. - सी. पी. राधाकृष्णन, राज्यपाल.
 

Web Title: renowned padma vibhushan ustad zakir hussain passes away in america at the age of 73

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.