पैसे फेडण्यासाठी तिने सरपंचपदच गहाण ठेवले
By Admin | Published: June 24, 2015 12:05 AM2015-06-24T00:05:28+5:302015-06-24T00:05:28+5:30
पैशाची परतफेड करण्यासाठी जमीन, शेत, घर, सोने, दागिने किंवा अगदी वेळच आली तर मंगळसूत्र सावकाराकडे गहाण ठेवण्याचे प्रकार ‘आम’ बात बनली असताना
रतलाम : पैशाची परतफेड करण्यासाठी जमीन, शेत, घर, सोने, दागिने किंवा अगदी वेळच आली तर मंगळसूत्र सावकाराकडे गहाण ठेवण्याचे प्रकार ‘आम’ बात बनली असताना चक्क सरपंचपदच गहाण ठेवत पॉवर आॅफ अॅटर्नी दुसऱ्याकडे देण्याचा अफलातून व अभूतपूर्व प्रकार मध्यप्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात घडला आहे. महिलांच्या सबलीकरणाकडे पाऊल टाकताना अशाप्रकारे पळवाटा शोधल्या जाणे ही गंभीर चिंतेची बाब असल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात उमटू लागल्या आहेत.
अशिक्षित बगदीबाई मेवासा ग्रामपंचायतच्या सरपंच बनल्या; मात्र नावालाच. कारण त्यांच्याकडील अधिकार त्यांनी स्टॅम्प पेपरवर ‘पॉवर आॅफ अॅटर्नी’द्वारे दीपक शर्मा नावाच्या व्यक्तीकडे सोपविले आहेत. ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरील या कराराची नोटरीत नोंद झाली आहे. त्याचे कारण निवडणुकीसाठी घेतलेल्या १५ हजारांची बगदीबाईला परतफेड करता आली नाही. दीपक शर्मा हेच सरपंचाच्या आविर्भावात कामकाज सांभाळत होते. या ग्रामपंचायतीचे नवे सचिव मांगीलाल चौधरी यांनी नियुक्तीनंतर शर्मा यांच्या कामात हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी बगदीबार्इंचे सरपंचपद गहाण असल्याचे दस्तऐवज दाखविले व हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत बगदीबाई विजयी झाल्या. शर्मा यांनी दोनच दिवसानंतर करारापत्रावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेत सरपंचपदाचे सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले.
अधिकारी व जनतेला भेटण्याचे कामही त्यांच्याकडेच असेल, असे करारात नमूद असून कहर म्हणजे जिल्हा न्यायालयाचे नोटरी आणि वकील कैलाश शर्मा यांनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. यास बगदीबार्इंचे मजूर पती कन्हैयालाल यांची संमती होती. (वृत्तसंस्था)