बाळंतपणाची रजा आता होणार दुप्पट
By admin | Published: December 30, 2015 03:45 AM2015-12-30T03:45:13+5:302015-12-30T03:45:13+5:30
खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेत वाढ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मंगळवारी यास दुजोरा दिला. या निर्णयानुसार
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात कार्यरत महिलांना मिळणाऱ्या प्रसूती रजेत वाढ करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी मंगळवारी यास दुजोरा दिला. या निर्णयानुसार, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना प्रसूती काळात मिळणारी १२ आठवड्यांची रजा आता २६ आठवड्यांची करण्यात येणार आहे.
कामगार कायद्यानुसार, प्रसूती काळात महिला नोकरदारांना सध्या १२ आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. प्रसूती आणि त्यानंतरच्या काळात बाळाच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयास पाठविण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शवली आहे, असे मनेका यांनी सांगितले.
यासाठी ‘मॅटर्निटी बेनेफिट्स अॅक्ट’मध्ये दुरुस्ती करावी लागेल. अलीकडेच महिला कल्याण मंत्रालयाने मालक, केंद्रीय कामगार संघटना आणि सरकारी अधिकारी यांची त्रिपक्षीय बैठक घेतली होती. त्यातही ही रजा २६ आठवड्यांची करण्यावर सहमती झाली होती. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनेही कामगार कल्याणाचा एक भाग म्हणून प्रसूतीकाळाच्या रजेवर भर दिला आहे. मातेच्या स्तनपानाने नवजात अर्भकास अनेक संभाव्य व्याधींपासून संरक्षण मिळते. शिवाय भावनिक नाते दृढ होण्यासाठीही बाळ सुरुवातीचे काही महिने मातेच्या सान्निध्यात असणे लाभदायी असते. (लोकमत न्यूज नेटवर्क)