अयोध्येत मंदिर आणि मशिदीची प्रतिकृती आमने-सामने
By admin | Published: December 26, 2015 02:15 AM2015-12-26T02:15:09+5:302015-12-26T02:15:09+5:30
अयोध्येत श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीची प्रतिकृती आमनेसामने उभी करून प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये व्यूहरचना आखण्यात आघाडी घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.
अयोध्या : अयोध्येत श्रीराम मंदिर आणि बाबरी मशिदीची प्रतिकृती आमनेसामने उभी करून प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये व्यूहरचना आखण्यात आघाडी घेण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. मुस्लिमांच्या एका गटाने बुधवारी सायंकाळी बाबरी मशिदीची छोटी प्रतिकृती प्रदशर््िात केल्यानंतर अयोध्येतील सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आणि गुप्तचर संस्थांनीही परिस्थितीवर पाळत ठेवायला सुरुवात केली आहे.
काही लोकांनी अयोध्येतील काझियाना भागात बाबरी मशिदीची ही थर्मोकोलची प्रतिकृती ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा भाग वादग्रस्त जागेशेजारी आहे.
विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराची प्रतिकृती तयार करून ती शिलांवर कलाकुसर करण्याच्या कार्यशाळेत ठेवली आहे. त्याचा प्रत्युत्तर म्हणून बाबरी मशीद कृती समितीशी संबंधित मुस्लिमांच्या एका गटाने बाबरी मशिदीची ही प्रतिकृती तयार करून विहिंपप्रमाणेच दगड मागविण्याची घोषणा केली आहे. विहिंप दररोज आपली मंदिराची प्रतिकृती दाखवित असतील तर आम्ही बाबरी मशिदीची प्रतिकृती का दाखवू नये, असा सवाल हाजी महबूब यांनी केला. शिला पूजनावरून दररोज वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न विहिंप करीत आहे. आता केवळ मशिदीची प्रतिकृती मिरवणुकीत सामील करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. ही प्रतिकृती अद्याप सार्वजनिक स्थळी ठेवण्यात आलेली नाही. परंतु सरकारने विहिंपच्या या कार्यशाळेवर अंकुश घातला नाही तर बाबरी मशीद कृती समितीही शिला आणून त्यावर कलाकुसर करण्याचे काम सुरू करण्यास मोकळी आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली पाहिजे, असे महबूब यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)