"ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार"; शहीद अंशुमन सिंह यांच्या पत्नीचे सासू-सासऱ्यांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:29 AM2024-07-13T10:29:18+5:302024-07-13T10:29:45+5:30
सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते.
लखनऊ: ज्याची जशी विचारसरणी तसेच तो बोलणार असे प्रत्युत्तर शहीद अंशुमन सिंह यांची पत्नी स्मृती हिने आपल्या सासू-सासऱ्यांना दिले आहे. राष्ट्रपती भवनात ५ जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमात आमचा मुलगा व शहीद जवान कॅप्टन अंशुमन सिंहला राष्ट्र मरणोत्तर कीर्ती चक्र देण्यात आले. त्याची पावतीही आमच्याकडे नाही. सुना घरातून पळून जातात असे अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते.
स्मृती सिंह सध्या पंजाबमध्ये आई- वडिलांकडे गेल्या आहेत. अंशुमनच्या आई-वडिलांनी केलेल्या आरोपांबाबत त्या म्हणाल्या की, मला काहीही माहिती नाही. स्मृती या बँकर असून, त्यांचे आईवडील शिक्षक आहेत.
आई म्हणते, फोटोशिवाय माझ्याकडे काही नाही
शहीद अंशुमनची आई मंजू सिंह यांनी म्हटले होते की, आमच्या शहीद पुत्राला कीर्ती चक्राच्या रुपाने खूप मोठा सन्मान मिळाला आहे. मी व स्मृती दोघांनी मिळून कीर्ती चक्राचा स्वीकार केला. पण, ते कीर्ती चक्र आमच्याकडे आमच्य नाही. आमची सून त्या सर्व गोष्टी घेऊन गेली. माझ्या मुलाच्या छायाचित्राशिवाय माझ्याकडे आता काहीही नाही.
शहीद अंशुमन सिंह यांच्या माता-पित्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपले म्हणणे त्यांच्या कानावर घातले. त्यांना मदत करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले होते.
सरकारकडून मिळाले होते ५० लाख रुपये
■ गेल्या वर्षी जुलै महिन्यात सियाचेनमध्ये आग लागल्याच्या घटनेत आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नांत अंशुमन सिंह शहीद झाले. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांच्या वारसदारांना ५० लाख रुपयांची मदत मिळाली होती.
■ मात्र, त्यातील ३५ लाख रुपये पत्नी स्मृती हिला मिळाले. आर्मी ग्रुप इन्शुरन्सचे पैसेही स्मृतीनेच घेतले, असा अंशुमन सिंह यांच्या मातापित्याचा दावा आहे.
■ या पैशांव्यतिरिक्त भारत व राज्य सरकारकडून आणखी काही पैसे मिळाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.