अमरनाथ यात्रेकरुंचं दहशतवाद्यांना उत्तर, भ्याड हल्ल्यानंतरही भाविक रवाना
By admin | Published: July 11, 2017 01:47 PM2017-07-11T13:47:47+5:302017-07-11T13:48:47+5:30
""बम बम भोले"" चा जयघोष करत यात्रेकरूंचा नवा जत्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 11 - दहशतवाद्यांनी सोमवारी (10 जुलै ) रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह 32 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत. एवढा मोठा दहशतवादी हल्ल्या झाल्यानंतरही जराही न डगमगता शेकडो यात्रेकरू कडक सुरक्षा व्यवस्थेत पवित्र गुफा मंदिराकडे रवाना झाले आहेत.
एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, ""बम बम भोले"" चा जयघोष करत यात्रेकरूंचा नवा जत्था आज सकाळी पहलगाम आणि बालटाल मार्गावरुन आपल्या पुढील यात्रेसाठी रवाना झाला आहे. हा भ्याड दहशतवादी हल्ला यात्रेकरूंच्या उत्साहावर परिणाम झालेला नाही. उलट हल्ल्यामुळे आमचे मानसिक धैर्य खचणार नाही, अशी सणसणीत चपराक एकप्रकारे यात्रेकरूंनी दहशतवाद्यांना दिली आहे. आम्ही भ्याड हल्ल्यांना घाबरणार नाही, असे उत्तर यात्रेकरुंनी दहशतवाद्यांना दिले आहे.
दरम्यान, सकाळी रवाना झालेल्या यात्रेकरूंचा नेमका आकडा समोर येऊ शकलेला नाही. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी बातम्या वाचा
कसा झाला हल्ला ?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (11 जुलै ) ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला.
लाखाहून अधिक यात्रेकरू
यात्रा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांत जवळचा बलतालहून जाणारा मार्ग व पहेलगामवरून जाणारा पारंपरिक मार्ग अशा दोन्ही मार्गांनी मिळून रविवारी १०,७६३ यात्रेकरूंनी यात्रा पूर्ण केली होती. अशा प्रकारे यंदा यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंची संख्या रविवार रात्रीपर्यंत १,२६,६०४ झाली होती.
नियमांचे उल्लंघन
यात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रा पूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.
थांबलेली यात्रा रवाना
बुऱ्हाण वणीच्या स्मृतिदिनी दहशतवादी संघटनांनी व फुटीरवाद्यांनी केलेले ‘बंद’चे आवाहन लक्षात घेऊन जम्मूपासून पुढची अमरनाथ यात्रा रविवारी स्थगित करण्यात आली होती. सोमवारी जम्मूच्या बेस कॅम्पपासून तुकड्या बलताल आणि नुनवान पहलगामकडे रवाना झाल्या होत्या.
दर्शन घेऊन परतणाऱ्या बलताल व पहेलगाम येथील यात्रेकरूंच्या तुकड्याही परतीच्या प्रवासात जम्मूकडे रवाना झाल्या होत्या. यात्रेकरूंच्या तुकड्यांनी स्वच्छ हवामानात गुंफेपर्यंतचा पुढचा प्रवास सुरू केला होता.
१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांड
अमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.
ही बस गुजरातची
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार ही बस गुजरातची असून, बसचा क्रमांक जीजे-०९-९९७६ आहे. अमरनाथ यात्रा निशाण्यावर असल्याचा इशारा दहशतवाद्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ज्या बसवर हल्ला झाला, ती बस सुरक्षेच्या घेऱ्यातही नव्हती. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली आहे.
भ्याड हल्ल्यासमोर झुकणार नाही
अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. भारत अशा भ्याड हल्ल्यासमोर कधीही झुकणार नाही. मी जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच मदतीचे आश्वासन दिले आहे.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान