"अहवाल अद्याप तयार नाही;" कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासावर WHO कडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 10:34 AM2021-03-17T10:34:41+5:302021-03-17T10:37:22+5:30
WHO : आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी केला होता चीनचा दौरा, तज्ज्ञांच्या अहवालावर अनेकांचं लक्ष
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासासाठी चीनला गेलेल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या विशेष टीमनं आपला अहवाल प्रकाशित करण्याचं तुर्तास टाळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार आता हा अहवाल पुढील आठवड्यात प्रकाशित केला जाण्याची शक्यता आहे. "सध्या हा अहवाल पूर्णपणे तार नाही. तज्ज्ञ आणि या टीममधील सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अहवाल पुढील आठवड्यात प्रकाशित होण्याची शक्यता आहे," अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते क्रिस्तियन लिंडमियर यांनी दिली. या अहावालाद्वारे करण्यात आलेले दावे आणि आरोपांबाबत तथ्यात्मक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कोरोना विषाणू पशूंमधून मानवात कसा आला यांसारख्या दाव्यांवरही माहिती मिळू शकते. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची टीम जवळपास एक महिना चीनमध्ये यावर शोध घेत होती.
चीनमधील वुहान या शहरातून संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा विषाणू वटवाघुळांमार्फत मानवामध्ये आला आहे, असा दावा करण्यात येत आहे. परंतु त्यांनी यावर अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. तसाच कधी या विषाणूचा प्रसार झाला याबाबतही अद्याप कोणती ठोस माहिती मिळालेली नाही. दरम्यान, वुहानचा दौरा पूर्ण केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सध्या कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकत नसल्याचं म्हटलं होतं.
सध्या संपूर्ण जग जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालाची प्रतीक्षा करत आहो. यामध्ये कोरोना विषाणूची उत्पत्ती, या प्रसार अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा विषाणू चीनमधील वुहान प्रांतातूनच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला आहे.