Republic Day : प्रजासत्ताक दिनाबाबतच्या १० इंटरेस्टींग गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 10:40 AM2019-01-25T10:40:34+5:302019-01-25T10:45:50+5:30
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचा नेहमीप्रमाणे सगळीकडे जल्लोष बघायला मिळत आहे. रस्त्या रस्त्यावर तिरंगा बघायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाचंभारतासाठी फार मोठं महत्त्व आहे. कारण याच दिवशी खऱ्या अर्थाने भारत लोकांचं राज्य झाला होता. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते. भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. चला जाणून घेऊ आणखीही काही खास गोष्टी....
१) जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी एक समिती नेमली गेली. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजर करण्यात येऊ लागला. संविधानाचा मसुदा सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर करण्यात आला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष, ११ महिने आणि १८ दिवस चर्चा केल्यानंतर समितीने हा मसुदा अंतिम केला.
३) १९५० मध्ये याच दिवशी १० वाजून १८ मिनिटांनी भारतीय संविधान लागू करण्यात आले होते. आणि त्यानंतर सहा मिनिटांनी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती.
४) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वजाचं ध्वजोरोहण करतात. तर पंतप्रधान अमर जवान ज्योतीवर देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव गमावलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतात.
५) १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी होणाऱ्या परेडसाठी कोणतीही निश्चित जागा नव्हती. कधी इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला तर कधी रामलीला मैदानावर प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात होता. नंतर १९५५ मध्ये राजपथ परेडसाठी निश्चित करण्यात आले.
६) परेडदरम्यान राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाते. ही सलामी भारतीय सेनेच्या ७ तोफांनी दिली जाते. या तोफा १९४१ मध्ये तयार करण्यात आल्या होत्या. राष्ट्रगीत सुरु होताच पहिली सलामी आणि नंतर ५२ सेकंदानंतर शेवटची सलामी दिली जाते.
७) दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एखाद्या देशाच्या मुख्य व्यक्तीला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं जातं. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला मुख्य अतिथी म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो हे आले होते.
८) दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या शेवटी Abide With Me हे ख्रिश्चन गाणं वाजवलं जातं. असे म्हणतात की, हे गाणं महात्मा गांधी यांना फार पसंत होतं.
९) प्रजासत्ताक दिनाच्या समारोह फार वक्तशीरपणे साजरा केला जातो. प्रत्येक सेकंदाचा हिशेब ठेवला जातो. म्हणजे कार्यक्रम जर एक मिनिट उशीराने सुरू झाला असेल तर १ मिनिट उशीरानेच संपतो.
१०) भारतीय संविधान हे पूर्णपणे हाताने लिहिले गेले होते. जे हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. हाताने लिहिलेल्या भारतीय संविधानाच्या कॉपी संसद भवनाच्या लायब्ररीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.