Republic Day 2018 : गरुड कमांडो जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र, पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपतींना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 02:28 PM2018-01-26T14:28:36+5:302018-01-26T17:56:36+5:30
राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी राजपथवर देशाची संस्कृती आणि शौर्याच्या प्रदर्शनादरम्यान एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.
नवी दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत 69 व्या प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी राजपथवर देशाची संस्कृती आणि शौर्याच्या प्रदर्शनादरम्यान एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी उपस्थित जनतेसहीत राष्ट्रपती रामनाथ कोविंददेखील भावुक झाले होते. भारतीय वायू सेनेचे (आयएएफ) गरुड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. अशोक चक्र हा शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. निराला जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झाले होते.
यावेळी राजपथवर जेव्हा शहीद निराला यांची शौर्यगाथा सांगण्यात आली, त्यावेळी परेड पाहण्यासाठी आलेली जनतादेखील भावुक झाली. 69 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान निराला यांची पत्नी यांना हा सन्मान देण्यात आला. भारतीय वायू सेनेच्या विशेष दलाचे कमांडोंनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत दोन हात करताना धैर्य व शौर्य दाखवत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. निराला हे 18 नोव्हेंबर 2017 रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील चंदरनगर गावातील गरुड कमांडोची तुकडी व राष्ट्रीय रायफलद्वारा संयुक्तरित्या राबवण्यात आलेल्या आक्रमक अभियानाचा एक भाग होते.
यावेळी गावातील एका घरामध्ये दहशतवादी लपले होते. गरुड कमांडोंच्या तुकडीनं या घराला चारही बाजूंनी घेरले होते. दहशतवाद्यांना पसार होण्यास यश मिळू नये, यासाठी ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते, त्याठिकाणी निराला स्वतः तळ ठोकून होते. सैन्याची तुकडी दहशतवादी बाहेर पडण्याची वाट पाहत असताना यावेळी एकूण 6 दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत त्यांच्या दिशेनं पळत आले.
यावेळी निराला यांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आणि एकाला जखमी केले. चकमकीदरम्यान निरालादेखील जखमी झाले होते. गंभीर स्वरुपात जखमी झालेले असतानाही निराला यांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई एका क्षणासाठीही थांबवली नाही. यावेळी सर्वच्या सर्व सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एकट्या निराला यांनीच तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.