Republic Day 2018 : 'त्या' वादानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा केरळमध्ये केलं ध्वजारोहण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 01:20 PM2018-01-26T13:20:08+5:302018-01-26T13:28:38+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये ध्वजारोहण केले. mohan bhagwat hoists flag in a school in kerala
पलक्कड - प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील एका शाळेमध्ये ध्वजारोहण केले. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथे जोरदार तयारी करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या वर्षीदेखील 15 ऑगस्ट दिनी भागवत यांनी एका शाळेमध्ये तिरंगा फडकावला होता, मात्र यावेळी त्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आल्यानं प्रचंड गोंधळ झाला होता.
यावेळीदेखील भागवत यांच्या दौऱ्याच्या बरोबर आधी केरळ सरकारनं एक परिपत्रक जारी केले होते. राज्यात सर्व सरकारी कार्यालयं, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण वेगवेगळ्या विभागातील अध्यक्ष करतील, असे निर्देश जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे देण्यात आले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या आताच्या नियम आणि निर्देशांच्या आधारावर संबंधित निर्देश जारी करण्यात आले आहेत आणि यामध्ये नवीन असे काहीही नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
RSS Chief Mohan Bhagwat unfurls tricolour at a school in Kerala's Palakkad #RepublicDaypic.twitter.com/c7mG0lMWMT
— ANI (@ANI) January 26, 2018
केरळ दौ-यावर जाण्यापूर्वी गुरुवारी मोहन भागवत यांचे मुंबईत आयएमसी चेम्बर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजच्या वतीने डॉ. भागवत यांचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या सभागृहात ‘राष्ट्रीयत्व आणि व्यावसायिक नीतिमत्ता’ या विषयावर व्याख्यान झाले. ‘आम्ही काही करू शकत नाही’ या पराभूत मानसिकतेतून भारतीय समाज बाहेर आला आहे. आमचा इतिहास, शौर्य, आमचे गुणविशेषांच्या सत्त्वावर इंग्रजांनी घाला घातला. आज ते पुन्हा जागृत झाले आहे. आम्ही करू शकतो; नव्हे आम्हीच करू शकतो हा भाव निर्माण झाला आहे. सीएसआर ही संकल्पना आज कायद्याने आणली गेली असली तरी ती भारतीय समाजात फार पूर्वीपासून आहे. आपल्यासोबतच आपल्या समाजाची समृद्धी साधली जावी, हेच आमचा व्यापारधर्म सांगत असल्याचे भागवत म्हणाले.
म्हणून जपान महासत्ता-
देशभक्ती, सर्व समाज एक परिवार असल्याची भावना, आर्थिक प्रगतीसाठी कुठलेही साहस करण्याची तयारी आणि विकासासाठी जोखीम पत्करण्याची तयारी यामुळे जपान महासत्ता बनू शकला. हे उदाहरण आमच्यासमोर आहे, असे सरसंघचालक म्हणाले.