प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस पदकाने सन्मानित होणार '12th Fail'चे IPS मनोज शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:27 PM2024-01-25T21:27:13+5:302024-01-25T21:28:26+5:30
भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील 1 हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.
Republic Day 2024: भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील 1 हजाराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना विविध श्रेणीतील शौर्य आणि सेवा पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा या विभागातील एकूण 1,132 जवानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांचाही यादरम्यान गौरव होणार आहे. मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर "12वी फेल" हा हिंदी चित्रपट बनला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने एका निवेदनात याबाबत माहिती दिली. 2005 च्या महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी मनोज कुमार शर्मा, त्यांचे बिहार केडरचे बॅचमेट जितेंद्र राणा आणि इतर काही जणांना गुणवंत सेवा पदक (MSM)देण्यात आले आहे. मनोज शर्मा आणि राणा, दोघेही CISF मध्ये प्रतिनियुक्तीवर असून, एव्हिएशन सिक्युरिटी विंग (ASG) मध्ये तैनात आहेत. दोन्ही अधिकारी अनुक्रमे मुख्य विमानतळ सुरक्षा अधिकारी (CASOs) म्हणून मुंबई आणि दिल्ली विमानतळावरील CISF युनिटचे प्रमुख आहेत.
राष्ट्रपतींचे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या नावे संबोधन
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी श्रीराम मंदिराचा उल्लेख केला आणि कर्पूरी ठाकूर यांनाही श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकाचे 75 वे वर्ष अनेक अर्थाने देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आपला देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करत आहे आणि अमृत कालच्या सुरुवातीच्या टप्प्यातून जात आहे. हा कालखंडातील परिवर्तनाचा काळ आहे.
भाषणात श्रीराम मंदिराचा उल्लेख
यावेळी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात राम मंदिराचा उल्लेख केला. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, अयोध्येतील भगवान श्री राम जन्मस्थानी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात स्थापन झालेल्या मूर्तीच्या अभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा आपण सर्वांनी पाहिला आहे, भविष्यात या घटनेला व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिले जाईल, तेव्हा इतिहासकारांना भारताची आठवण होईल.