प्रजासत्ताक दिनी Fighter Jet 'गरजणार'; PM मोदी-राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासमोर राफेल-सुखोईसह ही विमानं कमाल दाखवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 11:05 AM2024-01-25T11:05:50+5:302024-01-25T11:08:08+5:30
यावेळची प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत विशेष असणार आहे.
भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी फ्रन्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन हे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्रपती गुरुवारी (२५ जानेवारी) दुपारी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये पोहोचतील. ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आमेर किल्ला, हवा महल आणि जंतरमंतरला भेट देतील. महत्वाचे म्हणजे, यावेळची प्रजासत्ताक दिनाची परेड अत्यंत विशेष असणार आहे.
यावेळी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय हवाई दलाची 51 विमाने कर्तव्यपथवरून उड्डाण करणार आहेत. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हवाई दलाच्या संचलन तुकडीचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. स्क्वाड्रन लीडर रश्मी ठाकुर, सुमिता यादव, प्रतीति अलहुवालिया आणि फ्लाइट लेफ्टनन्ट कीर्ति रोहिल संचलन तुकडीचे नेतृत्व करतील. हवाई दलाच्या संचलनात 144 हवाई योद्धा सहभाग घेणार आहेत.
मॅक्रॉन-मोदी यांच्या डोक्यावरून उडणार लढावू विमानं -
प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर लढाऊ विमानांची एक संपूर्ण तुकडी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या डोक्यावरून जाईल. 29 लढाऊ विमाने, आठ मालवाहू विमाने, 13 हेलिकॉप्टर्स आणि एक हेरिटेज विमान, अशी एकूण 51 हवाई दलाची विमानं वेगवेगळ्या पद्धतीच्या हवाई कसरती करताना दिसतील. यात राफेल, सुखोई-30, जग्वार, सी-130 आणि तेजस विमानांचा समावेश असेल.
असा असेल मायक्रॉन यांचा दौरा -
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रपती मॅक्रॉन दुपारी अडीच वाजता जयपूर विमानतळावर पोहोचतील. यानंतर ते जयपूरमध्येच राहणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता पंतप्रधान मोदी त्यांचे स्वागत करतील. यानंतर, दोन्ही नेते जंतरमंतर, हवा महलसह सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देतील. मोदी आणि मॅक्रॉन यांचा रोड शो देखील होणार आहे. संध्याकाळी 7.15 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यात संरक्षण, व्यापार, भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा आदी विषयांवर चर्चा होणार आहे.
द्विपक्षीय चर्चेनंतर राष्ट्रपती मॅक्रॉन रात्री 8.50 वाजता दिल्लीला रवाना होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर ते हॉटेलमध्ये परततील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासाठी विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी झाल्यानंतर ते शुक्रवारी रात्री 10.05 वाजता दिल्लीहून पॅरिसला रवाना होतील.