शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 03:03 AM2020-01-27T03:03:58+5:302020-01-27T03:05:01+5:30
रविवारी सकाळी शाहीनबागमध्ये हजारो आंदोलक उपस्थित होते.
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुमारे दीड महिन्यापासून दिल्लीत शाहीनबाग येथे महिलांचे आंदोलन सुरू आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतानाच शाहीनबागमध्ये आंदोलकांनी ध्वजारोहण केले. राजपथवर प्रजासत्ताक दिन सोहळा पाहण्यासाठी जाणाऱ्या दिल्लीकरांप्रमाणेच शाहीनबागमध्येही प्रचंड उत्साही वातावरण होते.
रविवारी सकाळी शाहीनबागमध्ये हजारो आंदोलक उपस्थित होते. त्यामुळे कालिंदी कुंज पार्कपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर प्रचंड गर्दी झाली होती. मध्यरात्रीनंतरच येथे प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू झाला. आंदोलकांनी राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून राष्ट्रगीताचे गायन केले.
आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिला, रोहित वेमुलाची आई आणि मॉब लिंचिंगमध्ये मारला गेलेला जुनैद खान याची आई यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण पार पडल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. शाहीनबागमधील हा ध्वजारोहण सोहळा देशभरात सीएएविरोधात एकवटलेल्या महिलांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.
मुखतार्त खातून यांनी सांगितले की, आम्ही येथे प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत कारण आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. माझ्यासाठी नव्हे तर माझ्या मुलांना स्वातंत्र्य हवे. शाहीनबागमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून मी दररोज येथे येत आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन आमच्या लढ्याला आणखी बळ देईल, असा विश्वासही खातून यांनी व्यक्त केला.
हिजाब अन् बांगड्या तिरंगी
शाहीनबागमधील आंदोलक महिलांनी वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला. महिलांनी परिधान केलेला हिजाब आणि बांगड्याही तिरंगी होत्या. त्यामुळे शाहीनबागमध्ये रविवारी तिरंगी उत्सव साजरा झाला.