धक्कादायक! प्रजासत्ताक दिनी मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून 3 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 04:08 PM2022-01-26T16:08:17+5:302022-01-26T16:09:56+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे.
नवी दिल्ली - देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान एका सरकारी शाळेत भीषण दुर्घटना झाली आहे. विजेच्या तारेचा झटका लागून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर तीन मुलं जखमी आहेत. बक्सर जिल्ह्यातील इटढी भागातील नाथपूर प्राथमिक शाळेत हा अपघात झाला. ध्वजारोहण सुरू असताना लोखंडी पाईप विजेच्या तारेवर पडल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे तिथे उभ्या असलेल्या चार मुलांना विजेच्या झटका लागला. यावेळी एकच आरडाओरडा झाला.
जखमी झालेल्या मुलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला. तर तीन मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी नाथपूर प्राथमिक शाळेत लोखंडी पाईप उभारण्यात आला होता. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी येथील शाळेत मोठ्या संख्येने मुले पोहोचली होती.
ध्वजारोहण सुरू असताना अचानक बाजूने जाणाऱ्या 11 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरवर पाईप पडला. त्यानंतर त्यात करंट आला. चार मुले त्या पाईपच्या संपर्कात आली आणि करंट बसला. शुभम कुमार, परमेश्वरा, कृष्णा आणि इंद्रजित अशी या मुलांची नावे आहेत. जखमी झालेल्या मुलांना रुग्णालयात आणण्यात आले आहे. पाचवीत शिकणाऱ्या शुभम कुमार या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकरी संतप्त झाले असून त्यांनी रास्ता रोको केला आहे. यानंतर पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.
गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर राजपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार विश्वनाथ राम रुग्णालयात पोहोचले. त्यांनी जखमी मुलांच्या प्रकृतीची कुटुंबीयांकडून माहिती घेतली. वीज पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप काँग्रेस आमदार विश्वनाथ राम यांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.