Republic Day Parade: सर्वोत्कृष्ट चित्ररथात उत्तर प्रदेशची बाजी, तर महाराष्ट्राला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 03:12 PM2022-02-04T15:12:53+5:302022-02-04T15:13:23+5:30
Republic Day Parade: महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' या चित्ररथानं पटकावला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये (Republic Day Parade) उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्ररथाला सर्वोत्कृष्ट राज्य चित्ररथ म्हणून निवडण्यात आले आहे. तर महाराष्ट्राच्या चित्ररथानं लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये (Popular Choice Category) बाजी मारली आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट मार्चिंग टीम म्हणून सीआयएसएफची (CISF) निवड करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
भारतीय नौदलाची सर्वोत्तम मार्चिंग फोर्स म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेने पॉप्युलर चॉईस श्रेणीत बाजी मारली आहे. याशिवाय शिक्षण मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले आहे, असंही संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.
Uttar Pradesh selected as best state tableau of Republic Day parade 2022; Maharashtra wins in the popular choice category; CISF named best marching contingent among CAPF: Defence Ministry pic.twitter.com/oyrMRDebbp
— ANI (@ANI) February 4, 2022
अभिनंदन #महाराष्ट्र!
महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' या चित्ररथाने लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार पटकाविला. नवी दिल्ली येथील राजपथावर #प्रजासत्ताकदिन निमित्त झालेल्या #चित्ररथ पथसंचलनात महाराष्ट्राने उत्तम सादरीकरण केले. यावर्षी प्रथमच ऑनलाईन मतदानाद्वारे चित्ररथाची निवड झाली pic.twitter.com/4KNTnxdLLE— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 4, 2022
महाराष्ट्राकडून 'जैवविविधता मानके'
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रासह १२ राज्यांची आणि ७ मंत्रालयांची चित्ररथ सादर केला होता. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला होता. यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंची आणि ६ फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली होती. तसंच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आले होते. त्यावर इतर छोटी आकर्षंक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती होती. चित्ररथावर १५ फूट भव्य असं ‘शेकरू’ राज्यप्राणी तसंच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आली होती.