उदे गं अंबे! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला दुसरा क्रमांक; तर 'या' राज्यानं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:49 AM2023-01-31T08:49:27+5:302023-01-31T08:49:57+5:30

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात.

republic day parade kartavya path maharashtra tableau 2023 won second prize | उदे गं अंबे! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला दुसरा क्रमांक; तर 'या' राज्यानं मारली बाजी

उदे गं अंबे! महाराष्ट्राच्या चित्ररथाला मिळाला दुसरा क्रमांक; तर 'या' राज्यानं मारली बाजी

googlenewsNext

नवी दिल्ली-

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीचं दर्शन या रथांमधून घडवलं जातं. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाची नेहमीच चर्चा होत असते. कारण सर्वोत्तम चित्ररथांची जेव्हा निवड करण्यात येते तेव्हा महाराष्ट्राचा चित्ररथ हमखास बक्षीस पटकावतो. याही वेळी महाराष्ट्रानं दुसरा क्रमांक पटकावला आहे. यावेळी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन चित्ररथातून घडवण्यात आलं होतं. अतिशय कल्पक पद्धतीनं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांची मांडणी रथावर करण्यात आली होती. रथाच्या सुरुवातीला संबळ वादकाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तर मागे फिरत्या स्वरुपात साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घडवण्यात आलं होतं. 

कर्तव्य पथावरील संचालनाची थिम यावेळी नारीशक्ती होती. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्यावतीनं साडेतीन शक्तीपीठांचं दर्शन घडवण्यात आलं होतं. चित्ररथांमध्ये एकूण १७ राज्यांच्या चित्ररथांची निवड झाली होती. तर पाच चित्ररथ सरकारच्या विविध मंत्रालयांची माहिती देणारे होते. नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.

अत्यंत दिमाखदार व आकर्षक पद्धतीने महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर संचलित झाला होता. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्या विलोभनीय प्रतिकृती चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असणारा लोककलाकार भव्य स्वरूपात दर्शवण्यात आला होता. चित्ररथा सोबत निषाद गडकरी व सुमित यांच्या समूह पथकाने शानदार नृत्य सादरीकरण केले होते. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले होते. कौशल इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन सुंदर गीत तयार केले होते. सिद्धेश व नंदेश उमप यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.

पहिला क्रमांक उत्तराखंडला
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे. तर पहिला क्रमांक उत्तराखंडच्या चित्ररथानं पटकावला आहे. तर उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. उत्तराखंडच्या चित्ररथाला 'मानसखंड' नाव देण्यात आलं होतं. यात देवनारच्या घनदाट जंगलातील पौराणिक धाम जागेश्वर धाम, प्रसिद्ध जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, बारहसिंगा, उत्तराखंडचा राज्यप्राणी कस्तूरी मृग, राष्ट्रीय पक्षी मोर, राज्यपक्षी घुघुती, चकोर, मोनाल आणि कुमाऊंची प्रसिद्ध ऐपण कलेचं दर्शन घडवण्यात आलं होतं.


 
तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळालेल्या उत्तर प्रदेश राज्यानं यावेळी अयोध्येचा चित्ररथ सादर केला होता. भगवान श्रीराम वनवासातून अयोध्येत परतल्यानंतर साजऱ्या केल्या गेलेल्या दिपोत्सवाची थिम उत्तर प्रदेशच्या चित्ररथातून दाखवण्यात आली होती. यात महर्षी वशिष्ठ यांचीही प्रतिमा साकारण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या चित्ररथानं पुरस्कार प्राप्त केला आहे.   

Web Title: republic day parade kartavya path maharashtra tableau 2023 won second prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.