Republic Day: या मंदिरात आज साजरा केला जातोय प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 10:24 AM2022-02-09T10:24:13+5:302022-02-09T10:25:10+5:30
Republic Day: संपूर्ण देशात 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. पण, या मंदिरात 9 फेब्रुवारीला साजरा केला जात आहे.
उज्जैन: 26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो, परंतु देशात एक मंदिर आहे जिथे आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. जाणून घ्या यामागचे कारण.
आज प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?
उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात राष्ट्रीय सण इंग्रजी कॅलेंडरनुसार साजरे केले जात नाहीत, तर हिंदू कॅलेंडरच्या तारखेनुसार साजरे केले जातात. त्यामुळे या मंदिरात आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी तिथीप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे.
अष्टमी तिथीला साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन
26 जानेवारी 1950 रोजी भारतात प्रजासत्ताकची स्थापना झाली होती. त्या दिवशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी होती. त्यामुळे दरवर्षी उज्जैनच्या बडा गणेश मंदिरात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. उज्जैनचे बडा गणेश मंदिर हे देशातील एकमेव असे मंदिर आहे जिथे हिंदू दिनदर्शिकेनुसार सर्व राष्ट्रीय सण आणि उपवास साजरे केले जातात.
10 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवला जातो
आज (9 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता गणेश मंदिरात प्रजासत्ताक अखंडतेसाठी आणि राष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी देवाची पंचामृत अभिषेक-पूजा करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 वाजता अक्षय कलशाची स्थापना करण्यात येणार असून 10 फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.
समृद्ध देशासाठी प्रार्थना होईल
पंडित आनंद शंकर व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिरात गणपतीला दुर्वा आणि लाल फुले अर्पण करून कोरोना संकट निवारणासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यात येणार आहे. याशिवाय भाविक मंदिरात येऊन देशात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतात.