प्रजासत्ताक दिनी सावधानतेचा इशारा
By admin | Published: January 17, 2016 01:54 AM2016-01-17T01:54:21+5:302016-01-17T01:54:21+5:30
पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोठेही घातपात होऊ नये यासाठी राजधानी दिल्ली आणि अन्य संवेदनशील ठिकाणी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
- नवीन सिन्हा, नवी दिल्ली
पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोठेही घातपात होऊ नये यासाठी राजधानी दिल्ली आणि अन्य संवेदनशील ठिकाणी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत आयबी आणि अन्य सुरक्षा संस्थांनी दिलेल्या ताज्या माहितीच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
युद्धसदृश परिस्थितीत जी सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते, तशीच सुरक्षा व्यवस्था दिल्लीतील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान सीमेशिवाय नेपाळ आणि बांगलादेश यांच्या सीमेवरही घुसखोरी उधळून लावण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. या काळात जैस-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोएबा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून घुसखोरी केली जाण्याची शक्यता आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने उचललेल्या पावलाने निर्माण झालेल्या वातावरणाला धक्का पोहोचविला जाण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन उपाययोजना आखल्या जात असल्याचे गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
पंजाब, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि अन्य काही राज्यांत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातही पंजाब आणि जम्मू-काश्मिरात अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय दले आणि दिल्ली पोलिसातील १० हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.यंदा प्रजासत्ताकदिनी फ्रेंच अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्टवर आहेत. त्यामुळेच सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या दृष्टीने अत्याधुनिक शस्त्रसामग्री देण्यात आली आहे. संचलन होणाऱ्या राजपथावर अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हा बंदोबस्त केवळ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमापुरताच असेल असे नव्हे, तर सायंकाळीही कायम राहील. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम सुरळीत पार पडावेत हा त्यामागचा हेतू असल्याचे गृहमंत्रालयाच्या या अधिकाऱ्याने सांगितले.
गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी राज्याचे पोलीस आणि अन्य संस्थांना भारत-पाक सीमेवर, तसेच संपूर्ण राज्यात योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यास सांगितले आहे. देशभरातील सुरक्षा व्यवस्थेवर निगराणी ठेवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणार उपयोग
मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
गेल्या सहा महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरीचे जवळपास ५० प्रयत्न झाले होते. ते सीमा सुरक्षा दलाने उधळून लावले असले तरीही तेथे आणखी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
यादृष्टीने सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना रात्री उपयोगी पडतील असे कॅमेरे आणि रडार यंत्रणा दिली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले आणि दूरवरील चित्रीकरण करू शकतील, असे कॅमेरे महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल. याशिवाय सोलार लाईट सिस्टीम आणि इन्स्टंट पॉवर बॅकअपची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यासाठी सरकार आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचीही मदत घेणार आहे. त्यात इस्रायलकडून अत्याधुनिक यंत्रणा घेतली जाईल. त्याद्वारे घुसखोरी रोखण्यासाठी भारत-पाक सीमेवर चांगले कुंपण घातले जाईल.
अतिरेक्यांविरुद्ध झीरो टॉलरन्स
गेल्या ६ महिन्यांत झालेल्या घुसखोरीच्या ५० प्रयत्नांपैकी २ प्रयत्न अतिशय गंभीर होते. बामियाल आणि लगतच्या नदी खोऱ्यावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. अतिरेक्यांविरुद्ध झीरो टॉलरन्स स्वीकारण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून येथील सुरक्षा कडक करण्यात येणार आहे.