एएन-32 अपघात: बचाव दलाची हवाई दलाकडून सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 08:22 AM2019-06-30T08:22:39+5:302019-06-30T08:23:22+5:30
17 दिवसांपासून अडकलेल्या बचाव दलातील सर्वजण सुखरुप
इटानगर: हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध घेताना अडकून पडलेल्या बचाव दलातील 15 जणांची हवाई दलानं सुखरुप सुटका केली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये अपघात झाला. यामध्ये विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त विमानातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव दल दुर्घटनास्थळी पोहोचलं होतं. मात्र या अपघातात विमानातील सर्वच जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे बचाव दलानं सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. मात्र यानंतर बचाव दल घटनास्थळी अडकून पडलं. यामध्ये हवाई दलाच्या 8, लष्कराच्या 4 कर्मचाऱ्यांचा आणि 3 सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची शनिवारी एएलएच आणि एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सुखरुप सुटका करण्यात आली. शिलाँगमधील हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी ही माहिती दिली.
बचाव पथकातील सर्वांची सुटका करण्यास आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सिंह यांनी सांगितलं. 'वातावरण खराब असल्यानं बचाव पथकाला दुर्घटना स्थळावरुन निघण्यास उशीर झाला. शनिवारी वातावरणात थोडी सुधारणा झाली. मात्र तरीही धोका कायम होता. यानंतर बचाव दलाच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आली,' अशी माहिती सिंह यांनी दिली.
अपघातग्रस्त विमानातील हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचे मृतदेह आणि विमानातील ब्लॅक बॉक्स आणण्यासाठी बचाव दल घटनास्थळी पोहोचलं होतं. सियांग जिल्ह्यातील डोंगराळ भागातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम 20 जूनला पूर्ण झालं. आसामच्या जोरहाटमधून 3 जूनला एएन 32 विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या 33 मिनिटांमध्येच हे विमान बेपत्ता झालं.