अग्निकांडस्थळी युद्धस्तरावर बचावकार्य

By admin | Published: April 11, 2016 02:26 AM2016-04-11T02:26:41+5:302016-04-11T02:26:41+5:30

कोल्लमलगतच्या पुत्तिंगल देवी मंदिर परिसरात वार्षिक उत्सवाच्या वेळी पहाटे ३.३० वाजेदरम्यान डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली असताना आगीच्या लोळाच्या

Rescue work at the fire-fighting station | अग्निकांडस्थळी युद्धस्तरावर बचावकार्य

अग्निकांडस्थळी युद्धस्तरावर बचावकार्य

Next

कोल्लम : कोल्लमलगतच्या पुत्तिंगल देवी मंदिर परिसरात वार्षिक उत्सवाच्या वेळी पहाटे ३.३० वाजेदरम्यान डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी बघण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली असताना आगीच्या लोळाच्या रूपाने मृत्यू दबा धरून बसला आहे, याची कुणी साधी कल्पनाही केली नसावी. अचानक कानठळ्या बसणाऱ्या भीषण स्फोटांनी आसमंत हादरून गेला आणि त्यातच वीज गेल्यामुळे पहाटेच्या अंधारात करुण किंकाळ्यांची भर पडली.
जीव वाचविण्यासाठी केलेली धावपळही अनेकांच्या जिवावर बेतणारी ठरली. अंधारात चेंगराचेंगरी होऊन कित्येक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले. आगीचा लोळ जवळच्या गोदामाजवळ पडताना बघितला आणि त्यानंतर प्रचंड आवाजाने परिसर हादरून गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी राजू या भाविकाने दिली. मंदिर बांधकामाचे काँक्रीट आणि लोखंडी ग्रील कोसळल्यामुळे अनेक जण दबून गेले. मंदिरापासून एक कि.मी. अंतरावरील माझ्या घरी हादरे जाणवले, असे गिरिजा या महिलेने सांगितले. अनेक भाविक काँक्रीट आणि लोखंडी सळया अंगावर कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडल्याचे रेड क्रॉसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अर्धवट किंवा पूर्ण जळून कोळसा झालेल्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम अवघड ठरले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी दिली आहे.
मंदिराची १५ सदस्यीय समिती दुर्घटनेच्या वेळी मंदिरात हजर होती; मात्र त्यानंतर हे लोक कुठेही दिसले नाहीत, अशी माहितीही गावकऱ्यांनी दिली. (वृत्तसंस्था)
> 1 जखमींना तातडीने रुग्णालयांमध्ये हलविण्यासह मृतदेह बाहेर काढण्यासाठी नौदल आणि वायुदलाची मदत घेण्यात आली आहे. स्थानिक प्रशासन आणि विविध संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. वायुदलाने (आयएएफ) जखमींना हलविण्यासाठी एकूण दहा विमाने आणि हेलिकॉप्टरचा वापर केला जात असून सर्व प्रकारची मदत दिली जात असल्याचे संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. विमानांना एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे स्वरूप देण्यात आले आहे. चेन्नईजवळील अराक्कोनम येथून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके, तसेच वैद्यकीय चमूंनी तातडीने उपचार करण्याचे काम चालविले आहे.
2 नौदलाने आयएनएस काब्रा, आयएनएस कल्पेनी आणि आयएनएस सुकन्या ही तीन जहाजे सेवेत रुजू केली असून, तातडीने औषधे पुरविता यावीत यासाठी कोल्लम तटावर औषधांची दुकाने लावण्यात आली आहेत. तटरक्षक दलानेही चेतक हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय चमूसह एक जहाज पाठविले आहे. आमचे सी ४२७ हे जहाज वैद्यकीय चमू आणि आवश्यक औषधांसह घटनास्थळी पोहोचले आहे. या चमूने रक्तदानासाठीही मदत दिली आहे. स्थानिक लोक स्वत:हून रक्तदानासाठी समोर आल्याचे तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने सांगितले. केंद्र सरकारने स्फोटके संरक्षण संघटनेच्या (पीईएसओ) मुख्य नियंत्रकांना घटनास्थळी पाठवून अवैध फटाके किंवा स्फोटकांचा वापर झाला काय, याचा तपास चालविला आहे.3 केरळमध्ये निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे जखमींवर उपचार करण्यासाठी दिली जाणारी मदत आचारसंहितेच्या कक्षेतून वगळण्याबाबत राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असल्याचे मुख्यमंत्री चंडी यांनी सांगितले. 4 केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी चंडी यांना फोन करून या दुर्घटनेबाबत माहिती मिळविली आहे. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत देऊ केली आहे. 5 भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केरळमधील जाहीर सभा रद्द करीत जखमींची भेट घेतली.

Web Title: Rescue work at the fire-fighting station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.