येणाऱ्या पंधरवड्यात रुग्णसंख्येचा कळस, तिसऱ्या लाटेबाबत संशोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 10:21 AM2022-01-24T10:21:20+5:302022-01-24T10:22:02+5:30
त्याआधी ७ ते १३ जानेवारी या कालावधीत तिचे प्रमाण २.२ टक्के, १ ते ६ जानेवारी या कालावधीत आर व्हॅल्यूचे प्रमाण ४ व २५ ते ३१ डिसेंबर या काळात २.९ होते.
नवी दिल्ली : येत्या पंधरवड्यात कोरोनाची तिसरी लाट कळस गाठण्याची शक्यता असल्याचे आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी म्हटले आहे. देशात संसर्ग प्रसाराचे प्रमाण (आर-व्हॅल्यू) १४ ते २१ जानेवारी या कालावधीत १.५७ पर्यंत कमी झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
संसर्ग प्रसाराबाबत आयआयटी मद्रासचा गणित विभाग व सेंटर फॉर एक्सलन्स फॉर कॉम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स यांनी संयुक्तरीत्या अभ्यास केला. प्रा. नीलेश उपाध्ये व प्रा. एस. सुंदर यांचे त्यासाठी संशोधकांना मार्गदर्शन लाभले आहे. याच्या प्राथमिक निष्कर्षात म्हटले आहे की, १४ ते २१ जानेवारी या कालावधीत आर-व्हॅल्यू १.५७ होती. त्याआधी ७ ते १३ जानेवारी या कालावधीत तिचे प्रमाण २.२ टक्के, १ ते ६ जानेवारी या कालावधीत आर व्हॅल्यूचे प्रमाण ४ व २५ ते ३१ डिसेंबर या काळात २.९ होते.
आर-व्हॅल्यूचे ही मुंबईमध्ये ०.६७, दिल्लीमध्ये ०.९८, चेन्नईमध्ये १.२, कोलकातामध्ये ०.५६ आहे. आयआयटी मद्रासच्या गणित विभागातील सहायक प्राध्यापक डाॅ. जयंत ओझा यांनी सांगितले की, मुंबई, कोलकातामध्ये आर व्हॅल्यूने याआधीच कळस गाठला असून, त्याचे प्रमाण ओसरत आहे, तर दिल्ली, चेन्नईमध्ये आर-व्हॅल्यूही १ च्या जवळपास आहे.
उपराष्ट्रपतींना दुसऱ्यांदा बाधा
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्गाची बाधा झाली. सध्या ते हैदराबादमध्ये असून, आठवडाभर विलगीकरणात राहतील. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व विलगीकरणात राहावे, असे आवाहन नायडू यांनी केले आहे. बाधेमुळे ते प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहाण्याची शक्यता कमी आहे.
डॉक्टरांना जाणवतोय थकवा
n कोरोनाच्या साथीने देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.
n डॉक्टरही अहोरात्र कार्यरत असून, त्यातील अनेक जण बाधित झाले.
n या सर्व गोष्टींमुळे डॉक्टरांनाही आता मानसिक, शारीरिक थकवा जाणवत आहे, असे दिल्लीच्या डॉक्टरांनी सांगितले.