समुद्रयानाद्वारे संशोधक जाणार सागराच्या तळाशी; भारताची नवी मोहीम, खनिज साठ्यांचा घेणार शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:55 AM2021-12-20T05:55:56+5:302021-12-20T05:56:54+5:30
त्या समुद्रयानात एकच व्यक्ती बसू शकत असे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अंतराळ यानाद्वारे माणसाला अवकाशात धाडण्यासाठी भारताने गगनयान मोहीम हाती घेतली असतानाच, दुसऱ्या बाजूला समुद्राच्या अथांग तळातील खनिज साठे शोधण्याकरिता व इतर रहस्ये उलगडण्यासाठी केंद्र सरकारने समुद्रयान मोहिमेलाही प्रारंभ केला आहे. ही माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी राज्यसभेत दिली.
यासंदर्भातील एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात ते म्हणाले की, समुद्राच्या तळात दडलेले खनिजांचे साठे शोधणे, जीवसृष्टीचा अभ्यास करण्याकरिता समुद्रयान मोहीम हाती घेण्याआधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (एनआयओटी) या संस्थेने एक पर्सनल स्फेयर यान बनविले होते. ते समुद्रात ५०० मीटर खोल जाऊ शकते. त्या समुद्रयानात एकच व्यक्ती बसू शकत असे.
पर्सनल स्फेयर यान ही २.१ मीटर व्यासाची पाणबुडी आहे. ती माइल्ड स्टीलपासून बनविण्यात आली आहे. या स्फेयर यानाचे बंगालच्या खाडीमध्ये काही दिवसांपूर्वीच परीक्षण करण्यात आले. ते यशस्वी ठरल्यानंतर समुद्रयान प्रकल्पाच्या अंमलबजावणीला हिरवा कंदील दाखविण्यात आला. तळाशी जाऊन खनिज साठे शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अमेरिका. रशिया, फ्रान्स, जपान, चीन या देशांमध्ये आता भारताचाही समुद्रयान प्रकल्पामुळे समावेश झाला आहे. समुद्रात खोलवर जाऊन तेथील स्थितीचे परीक्षण करण्यासाठी या देशांकडे विशेष प्रकारच्या पाणबुड्या आहेत. भारताकडेही तशाच प्रकारची पाणबुडी उपलब्ध झाली आहे.