आरक्षण युतीला अनुकूल, आघाडीला प्रतिकूल
By admin | Published: October 5, 2016 11:04 PM2016-10-05T23:04:38+5:302016-10-06T00:19:03+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्ते साफ
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्ते साफ
गणेश धुरी
नाशिक : जिल्हा परिषदेची बुधवारी काढण्यात आलेली ७३ गटांची सोडत शिवसेना व भाजपा युतीला काहीशी अनुकूल पडली आहे. त्यामानाने राष्ट्रवादीतील २७ पैकी १२ सदस्यांचे आणि कॉँग्रेसच्या विद्यमान १४ पैकी १३ सदस्यांचे गट आरक्षित झाल्याने आघाडीला काहीसे प्रतिकूल ठरले आहे. त्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ चारच असून त्यांना आरक्षणाचा फारसा फरक पडणार नाही. तर शिवसेनेच्या २१ पैकी अवघ्या ७ ठिकाणी विद्यमान सदस्यांना फटका बसला आहे. उर्वरित ठिकाणी शिवसेनेला एकतर कुटुंबातील सदस्य किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण आरक्षण असल्याने उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार नाही.
या आरक्षणामुळे प्रामुख्याने नाशिकचा विचार केला तर विद्यमान अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचा गट आरक्षित झाल्याने त्यांना गटाची शोधाशोध करावी लागणार आहे. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना पुन्हा संधी नसली तरी कुटुंबातील महिलेला दुसर्या तालुक्यातून उभे करावे लागेल. गटनेते रवींद्र देवरे तीन वेळा निवडून येऊनही त्यांची आरक्षणाने गोची केली आहे. सभापती उषा बच्छाव यांना वाखारी गट सर्वसाधारण महिला असला तरी त्यांची उभी राहण्याची शक्यता त्यांनीच नाकारली आहे. आरक्षणाने राष्ट्रवादीचे पारडे जड असलेल्या गटांचा विचार केला तर उमराणे डॉ. भारती पवार, कोचरगाव संगीता ढगे, दुगाव विलास माळी, तळेगाव रोही सुरेखा जिरे, वडनेर भैरव ज्योती माळी, नगरसूल साईनाथ मोरे, राजापूर प्रवीण गायकवाड, पळसे अलका साळुंखे, नायगाव अर्जुन बर्डे, चास अर्जुन मेंगाळ या निवडून आलेल्या सदस्यांचे गट एकतर आरक्षित झाल्याने किंवा खुले झाल्याने राष्ट्रवादीची कोंडी होऊ शकते. त्या तुलनेने शिवसेनेचे आमदार आणि मंत्री असलेल्या निफाड, सिन्नर व मालेगाव तालुक्यात शिवसेनेचे पारडे जड ठरू शकते. कारण येथील बहुतांश गट ओबीसी आणि सर्वसाधारण असल्याने शिवसेनेसोबत भाजपालाही चांगली संधी आहे. मालेगावमध्ये प्रशांत हिरे विरुद्ध राज्यमंत्री दादा भुसे, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध आमदार राजाभाऊ वाजे तर निफाडमध्ये आमदार अनिल कदम विरुद्ध भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश पाटील असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव व बागलाणमध्ये प्रत्येकी सात, दिंडोरी सहा तर निफाडमध्ये जिल्हा परिषदेचे दहा गट असल्याने ७३ पैकी ३० गटांचा निकाल निर्णायक राहणार आहे.