आरक्षण धोक्यात !

By Admin | Published: April 12, 2016 05:23 AM2016-04-12T05:23:49+5:302016-04-12T05:23:49+5:30

ज्यांनी आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला, तेच आता त्यांच्या नावाचा आधार घेत असून देशातील आदिवासी व दलितांचे आरक्षण धोक्यात आहे, अशा शब्दांत अ.भा. काँग्रेस समितीच्या

Reservation hazard! | आरक्षण धोक्यात !

आरक्षण धोक्यात !

googlenewsNext

सोनिया व राहुल गांधींचा हल्लाबोल : नागपूरच्या सभेत ‘जयभीम’चा नारा

नागपूर : ज्यांनी आजवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला, तेच आता त्यांच्या नावाचा आधार घेत असून देशातील आदिवासी व दलितांचे आरक्षण धोक्यात आहे, अशा शब्दांत अ.भा. काँग्रेस समितीच्या अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपावर हल्लाबोल केला. या मनुवादी विचारधारेचा काँग्रेस दटून सामना करेल, त्यांच्यासमोर झुकणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
अ.भा. काँग्रेस समितीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्ष सोहळ्याचा समारोप सोमवारी कस्तूरचंद पार्क येथे झाला. या वेळी झालेल्या भरगच्च सभेत सोनिया गांधी व राहुल यांनी भाजपा व संघ परिवारावर जोरदार हल्ला चढविला. दोन्ही नेत्यांनी भाषणाची सुरुवात व शेवट ‘जय भीम’चा जयघोष करीत केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादनही केले. सभेपूर्वी सोनिया व राहुल गांधी यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. तर सभास्थळी येताच त्यांनी दुसऱ्या मंचावर बसलेल्या भिक्खुसंघाजवळ जाऊन त्यांना चिवरदान दिले व आशीर्वाद घेतले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते उपस्थित होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, अ.भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस दिग्विजय सिंह, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या, माजी मंत्री आॅस्कर फर्नांडिस, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, वीरप्पा मोईली, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, राजीव शुक्ला, मोहसिना किडवई, मुनिअप्पा, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष के. राजू, कृपाशंकर सिंग, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,नारायण राणे, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, पी.एल. पुनिया, खासदार विजय दर्डा, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

संघाचे लोक मंत्र्यांचे ‘ओएसडी’ !
देशातील बहुतांश विद्यापीठांमध्ये संघाचेच लोक कुलगुरू म्हणून नियुक्त होत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात दलित व वंचितांचा शिरकाव होऊ नये, हे त्यांचे कारस्थान आहे. अगदी प्रशासकीय क्षेत्रातदेखील हेच चित्र आहे. संघाचे लोक मंत्र्यांचे ‘ओएसडी’ बनून मंत्रिमंडळ चालवत आहेत. खुद्द भाजपाचेच खासदार अशी खंत व्यक्त करीत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, सराफा व्यापारी हवालदिल झाले आहेत, विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. कोणी मरण पावले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही फरक पडत नाही, संघ सांगेल तेवढेच ते करतात,अशा शब्दात त्यांनी पंतप्रधान मोदींवर नेम साधला.

कस्तूरचंद पार्क फुल्ल
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना जीवनदायी योजनेच्या लोकार्पणासाठी कस्तूरचंद पार्कवर झालेल्या सोनिया गांधी यांच्या सभेला अलोट गर्दी झाली होती. एवढा मोठा जनसमुदाय पाहून काँग्रेस नेत्यांचाही उत्साह वाढला.

महिलांना वंचित ठेवण्याचे सरकारचेच कारस्थान
केंद्र शासन संघाच्या इशाऱ्यावर चालत आहे. मोदी हे डॉ. आंबेडकर यांचे प्रशंसक असल्याचा दावा करतात. परंतु त्यांनी वंचितांसाठी असलेल्या विविध योजनांच्या तरतुदींमध्ये कपात केली आहे.
वंचितांसाठी काही करायचे नसेल तर मग प्रशंसक असल्याचे ढोंग का? देशात दुफळी माजविण्याचे प्रयत्न सुरू असताना मोदी यांनी मौन साधले आहे हे आश्चर्यजनक आहे, असे सांगत हरियाणा व राजस्थान येथील पंचायच समितीच्या निवडणुकांमध्ये शिक्षणाचे कारण देऊन दलित महिलांना निवडणूक लढण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात मोदी सरकारचेच कारस्थान आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

मनुवाद आजही कायम
मनु विचारसरणीमुळे डॉ. आंबेडकर यांना शालेय जीवनात स्पृश्य-अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. त्यामुळेच त्यांनी मनु विचारसरणीच्या विरोधात लढा दिला. परंतु, अजूनही मनुची विचारसरणी देशात कायम असून, त्यातूनच रोहित वेमुलाची हत्या झाली, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
रोहित वेमुला याने अन्यायाविरुद्ध आवाज उठविला; परंतु त्याचा आवाज दाबण्यात आला. त्याने आत्महत्या केली नसून न्याय मिळावा यासाठी बलिदान दिले आहे. मी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहिलो. यापुढेदेखील मी त्यांच्यासाठी लढतच राहील, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

 

 

Web Title: Reservation hazard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.