आरक्षणाचा वणवा
By admin | Published: August 27, 2015 05:29 AM2015-08-27T05:29:02+5:302015-08-27T05:29:02+5:30
ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली गुजरातेतील पटेल समाजाने उभारलेल्या आंदोलनातून उफाळलेल्या हिंसाचाराचे लोण
अहमदाबाद : ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली गुजरातेतील पटेल समाजाने उभारलेल्या आंदोलनातून उफाळलेल्या हिंसाचाराचे लोण अहमदाबादसह राजकोट, जामनगर, पाटण, सूरत व मेहसाणामध्येही पोहोचले असून, त्यात आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले. मंगळवारी रात्रीच्या हिंसक घटनांची बुधवारी सकाळीही अनेक शहरांत पुनरावृत्ती झाल्यानंतर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास दंगलविरोधी दल व निमलष्करी दलाचे ५००० हजार जवान तैनात करण्यात आले. शिवाय लष्करालाही पाचारण करण्यात आले. राज्याच्या अनेक मुख्य शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.
गुजरातच्या अनेक भागांत हिंसाचार भडकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी सकाळी चर्चा केली. त्यानंतर निमलष्करी दलाचे सुमारे पाच हजार जवान गुजरातकडे रवाना झाले.
हिंसाचाराच्या अफवा पसरू नये म्हणून गुजरातमध्ये वॉट्सअप आणि मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पोलीसच जबाबदार
पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार, असा इशारा दिला असून हिंसाचारासाठी पोलिसांना जबाबदार ठरवले आहे. बळाचा वापर करून पोलिसांनीच हिंसेला तोंड फोडले.
माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध आहे, हे सरकारने सिद्ध करून दाखवावे. माझा वा माझ्या आंदोलनाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.
- हार्दिक पटेल
बंधू-भगिनींनो, मी विनंती करतो की संयम राखा; शांतता बाळगा. हिंसेतून नव्हे, तर चर्चेतून सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते. सरकार सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन चर्चेतून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे; मात्र हिंसक आंदोलनाला आमचा विरोध आहे.
- लालूप्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख