रिझर्व्ह बँकेकडून सरकारला १.७६ लाख कोटींचे घबाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:47 AM2019-08-27T06:47:59+5:302019-08-27T06:48:10+5:30
लाभांशाखेरीज संचित निधीही सरकारी तिजोरीत जमा
मुंबई : रिझर्व्ह बँकेने पर्याप्त भांडवली निधीचे नवे सूत्र स्वीकारण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पुरेशी भांडवली तरतूद करून शिल्लक राहणारा निधी केंद्र सरकारकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१८-१९ या वर्षातील १.७६ लाख कोटी रुपये केंद्राला दिले जातील.
डॉ. रघुराम राजन गव्हर्नर असताना यावरूनच सरकार व बँकेत तणातणी झाली होती. त्यानंतर सूत्र ठरविण्यास माजी गव्हर्नर डॉ. बिमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला. गेल्या वित्तीय वर्षाच्या ताळेबंदानुसार बँकेकडे १.२३ लाख कोटींचा संचित निधी व जोखीम तरतुदींसाठीचा ५२,६३७ कोटींंचा जास्तीचा निधी ही अधिकची रक्कम केंद्राला सुपुर्द करण्यासही मंडळाने मंजुरी दिली.