रिझर्व्ह बँकेकडे सुट्या नाण्यांचा पडला प्रचंड खच; मागणीत झाली माेठी घट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:10 AM2021-08-30T08:10:38+5:302021-08-30T08:10:45+5:30
पंचाईत : महागाई, डिजिटल व्यवहारामुळे वाढली चिंता; मागणीत झाली माेठी घट
नवी दिल्ली : महागाई आणि डिजिटल व्यवहारांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एका वेगळ्याच चिंतेने ग्रासले आहे. ती म्हणजे नाण्यांची. आजकाल १, २, ५ आणि १० रुपयांच्या चलनी नाण्यांची चलती कमी झाली आहे. त्यामुळे बँकेकडे असलेला नाण्यांचा साठा खपवायचा कसा, असा प्रश्न बँकेला पडला आहे.
गेल्या २-३ वर्षांमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये माेठी वाढ झाली आहे. अगदी १० रुपयांपासून ते काही हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार यूपीआय, वाॅलेट ॲप किंवा माेबाईल बँकिंगच्या माध्यमातून सहज हाेतात. त्यामुळे खिशात जास्त चिल्लर ठेवण्याची गरज वाटत नाही. परिणामी १, २, ५ आणि १० रुपयांच्या सुट्या नाण्यांची मागणीच कमी झाली आहे.
लाेकांनी चिल्लर पैसे ठेवणे कमी केल्यामुळे आरबीआयची मात्र पंचाईत झाली आहे. इतर बँका पूर्वीप्रमाणे नाणी घेत नाहीत. त्यामुळे बँकेत नाण्यांचा प्रचंड माेठा साठा झाला आहे. ताे ठेवायचा कुठे, हा प्रश्नही बँकेपुढे आहे. नाण्यांच्या समस्येवर आरबीआयने शक्कल लढविली आहे. नाण्यांना खपविण्यासाठी आरबीआयने बँकांना मिळणाऱ्या इंसेंटीव्हमध्ये वाढ केली आहे. एका बॅगवरील इंसेंटीव्ह २५ रुपयांपर्यंत ६५ रुपये एवढे वाढविले आहे. ग्रामीण किंवा सेमी अर्बन भागात नाणी जास्त वाटल्यास आणखी १० रुपयांचा इंसेंटीव्ह मिळेल.