लक्ष्मी हत्तिणीच्या अकस्मात मृत्यूने हळहळले पुडुचेरीवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:41 AM2022-12-02T09:41:15+5:302022-12-02T09:41:41+5:30
हृदयविकाराच्या झटक्याने अचानक कोसळली रस्त्यावर
पुडुचेरी : पुडुचेरी येथील श्री मनकुला विनयगर या प्रसिद्ध मंदिरातील लक्ष्मी या हत्तिणीला नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला नेले असताना बुधवारी अचानक रस्त्यात कोसळून तिचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञाने म्हटले आहे. लक्ष्मी ही हत्तीण त्या मंदिराचे अभिमानस्थळ होतीच; पण अनेकांची ती लाडकी होती. तिच्या निधनाने भाविकांवर शोककळा पसरली आहे.
लक्ष्मी हत्तिणीची लोकांना इतकी ममता वाटायची की तिच्या मृत्यूनंतर पुडुचेरीचे नायब राज्यपाल तामिलसाई सुंदरराजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली. बुधवारी सकाळी लक्ष्मी पुडुचेरीतून फेरफटका मारत असताना एका महाविद्यालयाच्या इमारतीजवळ अचानक रस्त्यावर कोसळली व तिचा मृत्यू झाला. या बातमीने सारे भाविक हळहळले. लक्ष्मी हत्तिणीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातून झपाट्याने सर्वत्र पसरली. पुडुचेरीतील अनेक भाविक तत्काळ घटनास्थळी गेले. तिथे त्यांनी लक्ष्मीच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले. तिच्या मृत्यूच्या कारणांबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती.
२०२० या वर्षाच्या प्रारंभी कोरोना साथीच्या काळात लक्ष्मी या हत्तिणीला श्री मनकुला विनयगर या मंदिरातून काही महिने दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. मात्र, भाविकांनी पुन्हा प्रयत्न करून लक्ष्मीला या मंदिरात आणले होते. लक्ष्मी हत्तीण या मंदिराचे वैभव असल्याची भाविकांची भावना होती.
अंतिम दर्शन घेताना भाविक झाले भावुक
लक्ष्मी हत्तिणीच्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सामील झाले होते. अनेक जण तिचे अंत्यदर्शन घेताना खूप भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळत होते. लक्ष्मीची श्री मनकुला विनयगर मंदिरात येणारे भाविक मनोभावे पूजा करीत असत. लक्ष्मी हत्तीण ही देवता आहे, अशीही भाविकांची श्रद्धा होती.