भूसंपादनावरुन शिवसेनेची विरोधकांना साथ ?
By admin | Published: July 28, 2015 06:39 PM2015-07-28T18:39:30+5:302015-07-28T18:54:09+5:30
भूसंपादन विधेयकासंदर्भात विरोधी पक्षांनी बोलवलेल्या बैठकीत शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी हजेरी लावल्याने शिवसेना - भाजपामधील धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - भूसंपादन विधेयकासंदर्भात विरोधी पक्षांनी बोलवलेल्या बैठकीत शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी हजेरी लावल्याने शिवसेना - भाजपामधील धुसफूस वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकाला आता एनडीएतील घटक पक्षांनी उघडपणे विरोध सुरु केल्याचे दिसते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी भूसंपादन विधेयकाला विरोधकांनी राज्यसभेत रोखून ठेवले असून या विधेयकावर सध्या संसदीय समिती विचारमंथन करत आहे. यापार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा व अन्य विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या बैठकीत मोदी सरकारने भूसंपादन विधेयक मागे घ्यावे अशी भूमिका सर्व पक्षीय नेत्यांनी मांडली. मात्र शिवसेनेने या विधेयकाला विरोध न करता त्यातीत काही मुद्द्यांवर आक्षेप घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेने विरोधी पक्षांना साथ दिली तर मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.