नाराज शहरप्रमुखासह सेनेच्या १६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By admin | Published: November 5, 2016 12:25 AM2016-11-05T00:25:24+5:302016-11-05T00:37:31+5:30
बैठक : निष्ठावंतांना डावलून विश्वासघात केल्याचा आरोप
सिन्नर : पालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी वाटप करताना निष्ठावान शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा विश्वासघात करीत ऐनवेळी शिवसेनेत आलेल्यांना उमेदवाऱ्या देण्यात आल्याचा आरोप करीत शहरप्रमुख राहुल बलक, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर वारुंगसे यांच्यासह १६ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. येत्या काही दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल बलक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व निष्ठावान शिवसैनिकांनी पालिका निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मागितली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना तिकीट देताना डावलण्यात आल्याने शहरप्रमुख बलक यांच्या निवासस्थानी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात शहरप्रमुख बलक यांच्यासह संजय कोतवाल, सागर जाधव, गणेश धनगर, दीपक घुमरे या चौघा उपशहरप्रमुख, दीपक भाटजिरे, संजय भोजने, बाळासाहेब आहिरे, अरुण नरोडे, संजय वरंदळ या पाच विभागप्रमुखांनी राजीनामे दिले. शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह युवा सेनेचे तालुकाप्रमुख सागर वारुंगसे, युवा सेनेचे शहरप्रमुख गौरव कर्पे, सरचिटणीस संज्योत सहाणे, उपशहरप्रमुख रवींद्र घोणे, नीलेश कडभाने, दीपक डेर्ले यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्याकडे या पदाधिकाऱ्यांनी
त्यांच्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. (वार्ताहर)