नरेंद्र मोदींच्या आकसापोटी काँग्रेसचे छत्र हरवलेल्या साहित्यिकांचे राजीनामे
By Admin | Published: October 17, 2015 04:07 PM2015-10-17T16:07:38+5:302015-10-17T16:07:38+5:30
साहित्यिकांचे राजीनामे हे मोदींविरोधात डाव्यांची असलेली खेळी अशी संभावना व्यंकय्या नायडू यांनी केली.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १७ - दादरी हत्या प्रकरण अत्यंत निषेधार्ह असून गुन्हेगारांना कठोर शासन व्हायलाच हवं या शब्दात केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी निषेध व्यक्त केला, मात्र, साहित्यिकांचे राजीनामे हे मोदींविरोधात डाव्यांची असलेली खेळी अशी संभावना केली. आधीच्या सरकारचा वरदहस्त असलेल्या काही साहित्यिकांना नरेंद्र मोदींना मिळालेले प्रचंड बहुमत पचलेले नाही आणि वैचारीक मतभेद असलेल्या या व्यक्ती मिळेल ती संधी साधत मोदी सरकारची बदनामी करत असल्याचा आरोप व्यंकय्या नायडू यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना केला. आणिबाणी, शीख हत्याकांड, कलबुर्गींची हत्या, दाभोळकर हत्या यावेळी हे लोक कुठे होते असा सवाल करत त्या त्या वेळी काँग्रेसचे सरकार असल्याने साहित्यिक गप्प राहिल्याचा आरोप नायडूंनी केला.
त्याचप्रमाणे देशाच्या कानाकोप-यात घडणा-या प्रत्येक निषेधार्ह घटनेची दखल पंतप्रधानांनी घ्यायलाच हवी ही मागणी हास्यास्पद असल्याचेही नायडू म्हणाले.
साहित्यिकांचे राजीनामे ही वाईट घटना असल्याचे सांगताना यामुळे केवळ भाजपाचीच नाही तर देशाचीही बदनामी होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अर्थात, देशातली सर्वसामान्य जनता सूज्ञ आहे तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही चतुर आहेत, त्यांच्यावर अशा भाजपाला जाणुनबुजून लक्ष्य करून करण्यात येत असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकूल परिणाम होणार नाही अशी आशाही नायडूंनी व्यक्त केली.