"मेट्रो मॅन"ला द्यायचा होता राजीनामा,पण आदित्यनाथांनी सोपवली दुहेरी जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:58 PM2017-07-21T15:58:26+5:302017-07-21T15:58:26+5:30
कामाच्या ताणातून सुटका करण्यासाठी 85 वर्षीय इ श्रीधरन यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 21 - कामाच्या ताणातून सुटका करण्यासाठी 85 वर्षीय इ श्रीधरन यांनी गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांनी लखनऊ आणि कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या सल्लागाराच्या भूमिकेतून आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी केली. मात्र, झालं याचं नेमकं उलटं. राजीनामा घेणं दूरच योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर आणखी एका कामाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर श्रीधरन कोच्ची परतले. कोच्ची येथे परतल्यानंतर डीएमआरसी कार्यालयात श्रीधरन यांनी याबाबत माहिती दिली.
मी तुम्हाला राजीनामा देण्याची परवानगी नाही देणार, या उलट तुम्हाला वाराणसी, आग्रा, मेरठ आणि गोरखपूर येथील जबाबदारी देण्यात येत आहे, असे सांगून त्यांना परत पाठवले. श्रीधरन अनेक वर्षांपासून मेट्रोसाठी काम करत आहेत. त्यामुळे मेट्रो मॅन अशीही त्यांची ओळख आहे. उत्तर प्रदेशच्या मेट्रो योजनेबाबत बोलताना श्रीधरन म्हणाले, कानपूर डेपो तयार आहे. त्याचबरोबर वाराणसी मेट्रो योजनेचा अहवाल तयार आहे. पण यामध्ये काही बदल करावे लागतील.गोरखपूर, आग्रा आणि मेरठ येथे मेट्रोसाठी सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. लखनऊ येथे 10.5 किमी पहिला टप्प्यातील मेट्रो तयार आहे. आता फक्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी त्याची पाहणी करणे राहिले आहे.
कोण आहेत श्रीधरन-
दिल्लीच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांतीकारक बदल घडवणारे म्हणून इ.श्रीधरन यांची ओळख आहे. इ.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची धूरा 1995 साली हाती घेतली, तेव्हा मेट्रो रेल्वे उभारणीचं आव्हान अशक्यप्राय कोटीतलं होतं. ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं. मेट्रोच्या उभारणीपूर्वी दिल्लीत प्रवास करणं हे एक दिव्य होतं आणि तिथे ब्ल्यु लाईन नावाच्या बसेस या रोज होणाऱ्या अपघातांसाठी कुप्रसिध्द होत्या. दिल्लीतील रस्त्यांवरील रहदारी आणि वाहतूक कोंडीने प्रवाशांचे अतोनात हाल होत असत, आज मेट्रोमुळे प्रवास सुसह्य झाला आहे. श्रीधरन यांनी अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने काटेकोरपणे मेट्रोची उभारणी करुन दाखवली. सरकारी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे त्यांनी सिद्ध करुन दाखवलं. श्रीधरन हे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ इंजिनिअर्सच्या 1981 सालच्या बॅचचे अधिकारी आहेत.